Corona Cases Update : जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात काही निर्बंध लादण्यात आले आहेत. तर दुसरीकडे देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 9,419 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर या व्हायरसमुळे 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, देशाचा रिकव्हरी रेट 98.36 टक्के आहे. तर गेल्या 24 तासांत 8,251 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 3,40,97,388 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्ह रेट 0.73 टक्के आहे. दरम्यान, पॉझिटिव्हिटी रेट सलग 66 दिवसांपासून 2 टक्क्यांनी खाली आला आहे. देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. तसेच प्रादुर्भावातही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
देशातील लसीकरणाची आकडेवारी
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण लसीकरण असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत लसीचे 80,86,910 डोस देण्यात आले आहेत.
राज्यात काल (बुधवारी) 893 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 10 जणांचा मृत्यू
कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल 893 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1040 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 89 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे
राज्यात काल 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6286 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 74 हजार 170 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 891 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 63 , 88, 902 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 250 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईत 250 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. याच कालावधीत मुंबईत 263 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 07 लाख 43 हजार 863 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. मुंबईचा कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 2915 दिवसांवर आलाय.
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह