लखनौ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरु असताना, कोरोना व्हायरसचा फैलाव कसा होतो याबाबत अभ्यासात अनेक बाबी समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये सांडपाण्यात कोरोनाचे विषाणू आढळल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर मात्र लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एसजीपीजीआयच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी सांगितले की, देशात सांडपाण्याचे नमुने आयसीएमआर-डब्ल्यूएचओमार्फत तपासले जात आहेत. यात उत्तर प्रदेशमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी एका जागी सांडपाण्यात कोरोना विषाणू आढळल्याचं निष्पन्न झालं आहे.
मायक्रोबायोलॉजी विभागाच्या एचओडीने डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी सांगितले की, आमच्या टीमने लखनौतील विविध ठिकाणाहून सांडपाणी चाचणीसाठी गोळा केले होते. ज्यामध्ये खदरा, मछली मोहल्ला आणि घंटाघर येथील सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी रुद्रपूर खद्रातील पाण्यात कोरोना विषाणू आढळल्याची खात्री झाली आहे. मात्र यातून कोरोनाचा फैलाव होणार की नाही होणार हा संशोधनाचा विषय आहे.
डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी पाण्यात आढळलेल्या नमुन्यांचा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला सादर केला आहे. त्यांनी सांगितले की पाण्यात कोरोना विषाणू आढळण्याचं कारण कोरोनाबाधित लोकांची विष्ठा आहे. जे लोक कोरोनाबाधित झाल्यांनंतर घरी क्वॉरंटाईन होतात. त्या घरातील सांडपाण्यातून हा कोरोना व्हायरस बाहेर पडत आहे. अर्धा टक्के कोरोना रूग्णांच्या विष्ठेमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे. अनेक देशांनी केलेल्या संशोधनात हे उघड झाले आहे.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी आणि आयसीएमआरसमोर त्यांनी अहवाल सादर केला आहे, त्यावर अंतिम अहवाल त्यांच्या वतीने देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. सांडपाण्याच्या नमुन्यांच्या चाचणीसाठी देशभरात 8 सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. यापैकी एक सेंटर लखनौ एसजीपीजीआय आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या जिल्ह्यांत गृह विलगीकरणास बंदी : आरोग्यमंत्री