नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दलालाकडून लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप वाड्रांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ईडीला (अंमलबजावणी संचलनालय) पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.


 

मीडिया रिपोर्टनुसार, 2009 साली झालेल्या एका शस्त्रास्त्रांच्या व्यवहारात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या दलालाकडून वाड्रा यांनी लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केली. त्याचा तपास केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सुरू केला आहे. या खरेदी केलेल्या घराचा पत्ता 12, एलरटन हाउस, ब्रायनस्टन स्क्वेअर, लंडन असा देण्यात आला आहे.

 

या तपासात रॉबर्ट वड्रा आणि त्यांचे सहाय्यक मनोज अरोरा यांनी पाठवलेल्या ई-मेलचा संदर्भ देण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारा दलाल संजय भंडारी याची कसून चौकशी करण्यात येत आहे. यावर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकार आणि ईडीला पत्र लिहून वाड्रा यांची देखील चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

मीडिया रिपोर्टनुसार, रॉबर्ट वड्रा आणि त्यांचे सहाय्यक मनोज आरोरा यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये अर्थिक देवाण-घेवाण, आणि लंडनमधील घराच्या नुतनीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. यासाठी तब्बल 19 पाउंड म्हणजे म्हणजे 19 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. हा व्यवहार ऑक्टोबर 2009 मध्ये करण्यात आला असून जून 2010 मध्ये याची विक्री करण्यात आली.

 

दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी हे सर्व आरोप तथ्यहिन असल्याचे सांगितले आहे.