नवी दिल्ली : भारत चीन सीमेवर घडलेल्या घटनेचा परिणाम अयोध्येतल्या राम मंदिराच्याही कामावर होताना दिसतोय. कारण सीमेवरच्या वाढत्या तणावामुळे राम मंदिराच्या उभारणीचं काम लांबणीवर टाकण्यात आलं आहे. राम मंदिर ट्रस्टनं अधिकृतपणे ही तारीख पुढे ढकलल्याचं जाहीर केलं आहे. सध्या भारत चीन सीमेवरची स्थिती ही चिंताजनक असून देशाचं रक्षण ही पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी मंदिर निर्मितीचं काम पुढे ढकललं जात असून स्थितीचा आढावा घेतल्यानंतर नवी तारीख जाहीर केली जाईल असं मंदिर ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.


सुप्रीम कोर्टानं मागच्या वर्षी ऐतिहासिक निर्णय देत वादग्रस्त जागेवर मंदिर निर्मितीस हिरवा कंदील दिला होता. मंदिर निर्मितीच्या कामासाठी राम मंदिर ट्रस्टवर कोर्टाच्याच आदेशानं जबाबदारी सोपवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मंदिर निर्मितीचं हे काम नेमकं कधी सुरु होणार याबाबत वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. काल काही हिंदी दैनिकांमध्ये 2 जुलैपासून राम मंदिर निर्मितीचं काम सुरु होणार, पंतप्रधान त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावणार अशा बातम्या आल्या होत्या. मात्र मंदिर ट्र्स्टनं या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं कालच जाहीर केलं होतं. आठवडाभरापूर्वीच अयोध्येत ज्या ठिकाणी मंदिर उभारलं जातंय, तिथे भव्य रुद्राभिषेकही आयोजित करण्यात आला होता.

Ram Mandir | रामलल्लाची मूर्ती बुलेटप्रूफ कॉटेजमध्ये ठेवणार! | ABP Majha

जमिनीच्या समतलीकरणाचं कामही सुरु होतं. मात्र आता भारत चीन सीमेवर वाढलेल्या तणावामुळे मंदिर निर्मितीचं काम पुढे ढकलायचं ट्रस्टनं ठरवलं आहे. अयोध्या शहरात काल काही हिंदुत्ववादी संघटनांनी चीनविरोधी निदर्शनंही केली होती. चिनी मालाची होळी, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या पुतळ्याची होळी करण्याचं काम विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्यामुळे आता मंदिर निर्मितीच्या शुभारंभाची नवी तारीख काय असणार याची उत्सुकता आहे.

कोरोना संकटामुळे याआधीचे अनेक मुहूर्त लांबणीवर पडले होते. डिसेंबर महिन्यात झारखंड निवडणुकीचा प्रचार करताना गृहमंत्री अमित शाह यांनी लवकरच मंदिर निर्मितीचं काम सुरु होणार असून, अवघ्या 4 महिन्यांत गगनचुंबी मंदिर अयोध्येत बनेल अशी गर्जना केली होती.

हे ही वाचा- BLOG | राम जाने..