Conrad Sangma Swearing In Ceremony: कोनराड संगमा (Conrad Sangma) यांनी दुसऱ्यांदा मेघालयच्या (Meghalaya) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी (PM Modi) , गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.


मेघालय विधानसभा निवडणूक 2023 साठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. 2 मार्च रोजी त्रिपुरा आणि नागालँडसह राज्य निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. कोनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ने 26 जागा जिंकल्या आहेत.


दोन उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ


राजधानी शिलाँगमध्ये कोनराड संगमा यांच्या सरकारच्या शपथविधी समारंभात दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. प्रेस्टन टायसॉन्ग आणि स्नियावभालंग धर यांना मेघालयचे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली.  अबू ताहिर मंडल, किरमेन शिला, मार्क्विस एन मारक आणि रखमा ए संगमा यांनी आपल्या मंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच अलेक्झांडर लालू हेक, डॉ. एम. अम्पारीन लिंगडोह, पॉल लिंगडोह आणि कॉमिंगन याम्बोन, शक्लियर व्हर्जरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.


45 आमदारांचा पाठिंबा


कोनराड संगमा यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी 22 आमदारांच्या स्वाक्षरीचं समर्थन पत्र राज्यपालांना सुपूर्द केलं होतं. नंतर त्यांना युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाच्या 11 आमदारांचा आणि पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटच्या आणखी 2 आमदारांचाही पाठिंबा मिळाला. संगमा यांना 45 आमदारांचा पाठिंबा मिळाला.  


मेघालयमध्ये कोनराड संगमा पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोनराड संगमा यांच्या एनपीपीनं 26 जागा जिंकल्या. मेघालयमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ दोन जागा जिंकता आल्या. भाजपसोबत, मेघालयातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष- युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (PDF) यांनी एनपीपीच्या नेतृत्वाखालील युतीला आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील आघाडी समर्थक आमदारांची संख्या 45 झाली आहे. संगमा म्हणाले की, एनपीपी मित्रपक्ष यूडीपीला आठ आणि 11 आमदारांसह पाठिंबा देईल, तर भाजपला प्रत्येकी दोन आमदार आणि एचएसपीडीपीला प्रत्येकी एक मंत्रीपद मिळेल. 


गेल्या विधानसभा निवडणुकीत काय परिस्थिती? 


मेघालयच्या गेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. 21 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, पण तो बहुमतासाठी कमी पडला. कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील NPP 19 जागांसह दुसऱ्या स्थानावर होतं. राज्यातील यूडीपीचे सहा सदस्य निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले. तसेच, राज्यातील पीडीएफनं चार जागा जिंकल्या होत्या आणि भाजप, एचएसपीडीपीनं प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीच्या निकालानंतर संगमा यांनी भाजप, यूडीपी, पीडीएफ, एचपीपीडीपी आणि अपक्षांसह युतीचं सरकार स्थापन केलं आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.