नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेस अध्यक्षपदावर राहुल गांधींच्या पुनरागमनासाठी काँग्रेस उत्सुक असताना दुसरीकडे खासदार संजय राऊत यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची मागणी सातत्यानं पुढे आणत आहेत. संजय राऊतांनी पुन्हा एकदा याबाबत वक्तव्य केल्यानंतर त्यावर काँग्रेसच्या गोटातून देखील जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत. कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांनी देखील या संदर्भात ट्वीट केले आहे. "बाहेरच्या मंडळींनी आधी यूपीएत यावं..मग मतांची दखल घेऊ", असा टोला सातव यांनी संजय राऊतांना दिला आहे. 


कॉंग्रेस खासदार राजीव सातव म्हणाले, सध्या महाराष्ट्रात काही नाजूक प्रश्न आहेत.काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. बाकी,  युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ.






काँग्रेसमध्ये पवारांच्या नावावरुन नाराजी नाही. उलट काँग्रेसचे काही लोकच अशी इच्छा व्यक्त करतात.  यूपीए बळकट व्हायला हवी अशी त्यांचीही इच्छा आहे असं राऊत म्हणाले .पण त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, संजय राऊतांनी आता या विषयावर बोलणं बंद करावं. आणि आता खासदार  राजीव सातव यांनी देखील संजय राऊतांना टोला दिला आहे. 


यूपीएचं अध्यक्षपद पवारांनी स्वीकारावं असं संजय राऊत जेव्हा जेव्हा म्हणतात तेव्हा तेव्हा एकप्रकारे राहुल गांधींच्या अपयशाची चर्चा सुरु होते. कारण काँग्रेस अध्यक्षच यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारत आले आहेत. एकीकडे राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद तातडीनं स्वीकारावं यासाठी काँग्रेसजन प्रयत्न करत असताना संजय राऊतांच्या या  वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय का हाही प्रश्न आहे. 


संबंधित बातम्या :


Sanjay Raut | शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांची बॅटिंग