मुंबई : गुरुवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ झाल्याचं पहायला मिळालंय. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,920 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा  44,920 इतका आहे. 


चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 65,700 रुपये मोजावे लागणार आहेत. गुरुवारी हा दर 65,300 इतका होता. 


गेल्या आठवड्याचा विचार करता केवळ बुधवारी सोन्याच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली होती. नाहीतर इतर दिवशी सातत्याने दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. गेल्या महिन्यात एक फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 49,450 इतका होता. 


मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो. 


अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा गुंतवणुकीचा पर्याय. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. अलिकडच्या काळात सोन्याच्या दरात झालेली घसरण पाहता येत्या काळातही थोड्याफार प्रमाणात दर घटण्याचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळत आहे. 


ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांनी प्रती 10 ग्रामसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता 11 हजारांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. त्यामुळे सोन्याची खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. 


कोरोना लसीकरणाच्या सत्राला सुरुवात झालेली असतानाच सोन्याचे दर मात्र कमीच होत आहेत. अमेरिकन बॉण्ड यील्डमध्ये झालेली वाढ हेसुद्धा यामागचं एक कारण ठरत आहे. जगभरातील गुंतवणुकदार अमेरिकन बॉण्डमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालं आहे, परिणामी याचे पडडसाद दरांवर उमटले आहेत.


संबंधित बातम्या :