मुंबई: काँग्रेसने 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी विचारमंथन सुरु केले आहे. 2014 पासून काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागलाय. अपयशही इतके मोठे की पंजाबसारखी राज्येही हातातून गेली. सतत पराभव पत्करावा लागत असल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसमध्ये फेरबदल करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. राहुल गांधी पक्षाला यश मिळवून देत नाहीत असे या नेत्यांना वाटत होते. म्हणूनच पक्षाचे नेतृत्वही गांधी कुटुंबाबाहेर द्यावे असेही या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे होते. जी-23 असं नाव दिलेल्या या काँग्रेसमधील 23 ज्येष्ठ नेत्यांनी यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्रही पाठवले होते. पण आजपासून उदयपुरमध्ये सुरु झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले की, काँग्रेसच्या काही नेत्यांना पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबाकडेच असावे असे वाटते. आणि त्याचाच परिणाम एका महत्वाच्या निर्णयात दिसून आला.


प्रख्यात निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर काँग्रेसला नवसंजीवनी देऊ इच्छित होते. त्यांनी रोड मॅपही तयार केला होता. यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचीही त्यांची इच्छा होती. पण त्यांच्या काही अटी काँग्रेसला मान्य झाल्या नाहीत. जी-23 गटातील आणि सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रावर सही असलेल्या एका काँग्रेस नेत्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी राहुल गांधींच्या स्वभावाबाबत स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले, राहुल गांधींना कार चालवायची आहे पण त्यांना चालकाच्या जागेवर बसायचे नाही. मागे बसून कार चालवायची आहे. आणि राजकारणात असे होत नाही. महत्वाच्या गोष्टींच्या वेळी राहुल गांधी परदेशात निघून जातात असेही या नेत्याने म्हटले होते. यावरूनच राहुल गांधींबाबत काँग्रेसचे भले पाहू इच्छिणाऱ्या नेत्यांच्या मनात काय आहे ते समोर येते.


मात्र काँग्रेस नेतृत्व याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे उदयपुरमधील शिबिरात स्पष्टपणे दिसून आले. काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी आयोजित तीन दिवसीय नवसंकल्प शिबिरात ‘एक कुटुंब एक तिकीट’ असा निर्णय घेण्यात आला. मात्र यातून गांधी कुटुंबाला वगळण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. खरे तर हाच महत्वाचा निर्णय होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही काळापासून सतत घराणेशाहीवर बोलत आले आहेत. त्यामुळे घराणेशाहीच्या आरोपावर काँग्रेस काय मार्ग काढते आणि भाजपला कसे प्रत्युत्तर देते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले होते. एक कुटुंब एक तिकिटाचा निर्णय शिबिरात झाला पण त्यातही काँग्रेसने खोच मारून ठेवली. एकाच कुटुंबातील व्यक्ती पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पक्षात काम करीत असेल तर त्यांना तिकीट देण्यात येईल असा ठराव मंजूर केला. यावरून काँग्रेस घराणेशाहीच्या बाहेर येण्यास तयार नाही हे दिसून आले.


शिबिराच्या उद्घाटनपर भाषणात सोनिया गांधी यांनी एक अत्यंत महत्वाचे वाक्य म्हटले आहे. वैयक्तिक अपेक्षांपेक्षा पक्षाला वर ठेवले पाहिजे. पक्षाने आपल्याला भरपूर काही दिले असून आता परतफेड करण्याची वेळ आली आहे, हे त्यांचे वाक्य. हे वाक्य खूप महत्वपूर्ण आहे. काँग्रेसमध्ये अनेक नेते असे आहेत ज्यांच्या अनेक पिढ्या पक्षात आहेत. पक्षाच्या नावावर या नेत्यांनी प्रचंड संपत्ती गोळा केलीय. पण जेव्हा निवडणुकीची वेळ येते तेव्हा काही नेते खिशात हात घालायला तयार नसतात. सोनिया गांधींना ही गोष्ट चांगलीच ठाऊक असल्याने त्यांनी परतफेडीचे वक्तव्य केले आहे. पण सध्याची परिस्थिती पाहाता काँग्रेस नेते परतफेड करतील का असा प्रश्न पडतो.


बरं काँग्रेसचे हे काही पहिलेच चिंतन शिबिर नाही. काँग्रेसचे हे पाचवे चिंतन शिबिर आहे. पण यापैकी फक्त एकदाच चिंतन शिबिर घेतल्यानंतर काँग्रेसला निवडणुकीत यश मिळाले आहे. काँग्रेसने पहिले चिंतन शिबिर १९७४ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये घेतले होते. या चिंतन शिबिरानंतर तीन वर्षांनी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि सत्ता गेली होती.


यानंतर राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पाच वर्षांनी गांधी कुटुंबाकडे पुन्हा काँग्रेसची सूत्रे आली आणि 1996 मध्ये काँग्रेसने पंचमढीमध्ये चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. मात्र या चिंतन शिबिराचा काँग्रेसला काहीही फायदा झाला नव्हता.


तिसरे चिंतन शिबिर 2003 मध्ये शिमला येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसने विरोधी पक्षांना एकत्र घेऊन मोट बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा त्यांना फायदाही झाला. 2004 मध्ये काँग्रेस सत्तेवर आली आणि जवळ जवळ दहा वर्ष म्हणजे 2014 पर्यंत राज्य केले.


यानंतर जानेवारी 2013 मध्ये काँग्रेसने जयपुर येथे चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात राहुल गांधी यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला. खासदारांची पुरेशी संख्या नसल्याने काँग्रेस संसदेत विरोधी पक्षनेतेपदही मिळवू शकली नाही. 2019 लाही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आणि काही राज्येही गमवावी लागली.


काँग्रेसच्या चिंतन शिबिरांचा हा इतिहास पाहता आणि काँग्रेसमधील नाराज नेत्यांची संख्या आणि गांधी कुटुंबाबाहेर नेतृत्वाची झालेली मागणी पाहाता उदयपुरमधील हे नवसंकल्प शिबिर काँग्रेसला खरोखर नवसंजीवनी देईल का असा प्रश्न मनात उद्भवतो.