नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बहुचर्चित बैठक आज राजधानी दिल्लीत पार पडली. पक्षाला नवा अध्यक्ष नेमका कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तरही आजच्या बैठकीनं दिलंय. शिवाय पक्षांतर्गत कलहावर उत्तर शोधण्याचाही प्रयत्न झालाय.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच नेमका कधी सुटणार? याचं उत्तर अखेर आजच्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत मिळालं आहे. सप्टेंबर 2022 मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल, ऑक्टोबर 2022 पर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगितलं जातंय. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीची सुरुवात झाली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या भाषणाने केली. मोदी सरकारच्या धोरणांवर हल्ला तर त्यांनी चढवलाच पण सोबत पक्षातल्या नेत्यांचेही कान उपटले.
काँग्रेस नेत्यांना सोनियांचे खडे बोल
काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी व्हावी असं सर्वांनाच वाटतं. पण त्यासाठी पक्षाचे हित सर्वोतपरी मानत आपण एकी बाळगणं आवश्यक आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्पष्टता हवी. त्याचं वेळापत्रक आजच आपल्याला मिळेल. मनमोकळ्या संवादाचं कायमचं मी समर्थन केलंय. पण माझ्यापर्यंत एखादी गोष्ट पोहचवण्यासाठी कुणी माध्यमांचा वापर करु नये.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका लवकरच होतायत. त्याबाबतही तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आलाय. त्यामुळे आता काँग्रेसला नवा अध्यक्ष फायनली पुढच्या वर्षभरात मिळणार. तो गांधी घराण्यातलाच असणार की बाहेरचा याची उत्सुकता असेल. आजच्या बैठकीत नेहमीप्रमाणे काही नेत्यांनी राहुल गांधींच्याच नावाचा आग्रही धरला. त्यामुळे पुन्हा राहुल गांधींचं कमबॅक होणार का? 2024 च्या दृष्टीनं काँग्रेस मोदी-शाहांना टक्कर देण्यासाठी उमेदीनं उभी राहणार का हे पाहावं लागेल.