PM Launches Ordnance Factory : आज दसऱ्याच्या निमित्तानं माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या राष्ट्राला समर्पित केल्या आहेत. 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेाचा हेतू पूर्ण करणाऱ्या या 7 कंपन्यांपैकी एक कंपनी नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये स्थित असणारी 'यंत्र इंडिया लिमिटेड' उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. 


उद्घाटनावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "41 आयुध निर्माण कारखान्यांना नवे रुप देण्याचा निर्णय आणि 7 नव्या कंपन्यांची सुरुवात, देशाच्या याच संकल्पयात्रेचा भाग आहे. हा निर्णय गेली 15-20 वर्षे प्रलंबित होता. मला पूर्ण विश्वास आहे की, या सर्व सात कंपन्या आगामी काळात भारतीय सैन्याची मोठी ताकद ठरतील." पुढे बोलताना ते म्हणाले की, "जागतिक महायुद्धावेळी भारताच्या आयुध कारखान्यांची ताकद जगाने पाहिली आहे. आपल्याकडे उत्तम संसाधने होती, जागतिक दर्जाचे कौशल्य होते. स्वातंत्र्यानंतर या कारखान्यांना अद्ययावत करण्याची, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता होती. मात्र, याकडे लक्ष दिले नाही." 


"आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशाचे लक्ष्य जगातील सर्वात मोठी सैन्य ताकद बनवण्याचे आहे, भारतात आधुनिक सैन्य विकासाचे आहे. गेल्या सात वर्षांत देशाने 'मेक इन इंडिया' च्या मंत्रासह हा संकल्प पुढे नेण्याचे काम केले आहे. आज देशाच्या संरक्षण क्षेत्रात जेवढी पारदर्शकता, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा वापर आहे, तो पूर्वी कधी नव्हता. स्वातंत्र्यानंतर प्रथमच संरक्षण क्षेत्रात व्यापक सुधारणा होत आहेत. एकल खिडकी प्रणालीची व्यवस्था केली आहे.", असंही पंतप्रधान म्हणाले. 


पंतप्रधान म्हणाले की, "काही वेळापूर्वीच संरक्षणमंत्रालयाने अशा 100 पेक्षा अधिक सामरिक उपकरणांची यादी जाहीर केली, ज्यांची आता आयात करावी लागणार नाही. नव्या कंपन्यांसाठी देशाने आतापासूनच 65 हजार कोटी रुपयांची ऑर्डर दिली आहे. यातून संरक्षण उद्योगांवर असलेला देशाचा विश्वास दिसून येतो. मी देशातील स्टार्टअप्सना सांगतो की, या 7 कंपन्यांच्या माध्यमातून देशाने नवी सुरुवात केली आहे, तुम्हीसुद्धा यात सहभाग घ्या; तुमचे संशोधन, तुमचे उत्पादन कशाप्रकारे या कंपन्यांसमवेत एकमेकांना लाभदायक ठरेल यावर विचार केला पाहिजे."