Congress On ABG Shipayard Scam :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात पाच ट्रिलियनचे बँक घोटाळे झाले असल्याची घणाघाती टीका काँग्रेसने केली. 


गुजरातमधील एबीजी शिपयार्ड कंपनीने 22,842 कोटींचा बँक घोटाळा केला असल्याचे समोर आले. या बँक घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांनी मौन सोडावे अशी मागणी काँग्रेसने केली. 


काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, या घोटाळ्या प्रकरणी पंतप्रधानांनी मौन का बाळगले आहे, एबीजी शिपयार्ड कंपनीचा मालक ऋषी अग्रवाल याला आजपर्यंत अटक का झाली असे प्रश्न वल्लभ यांनी उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आश्वासन दिले होते. मात्र, मागील सात वर्षाच्या काळात देशाला पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था मिळाली नाही. पण, पाच ट्रिलियनचे बँक घोटाळे झाले असल्याचे त्यांनी म्हटले. रिझर्व्ह बँकेच्या निरीक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. 


आरबीआयच्या डेटामध्ये एबीजी शिपयार्डचा घोटाळा का दिसून आला नाही, आरबीआय या प्रकरणात कोणतीही कारवाई का करत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 


गौरव वल्लभ यांनी सांगितले की, फेब्रुवारी 2017 मध्ये एबीजी शिपयार्ड आणि त्याच्या प्रवर्तकावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. बँकांनीदेखील सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, सीबीआयने फेब्रुवारी 2022 मध्ये ही तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी या घोटाळ्याकडे मोदी सरकारचे वारंवार लक्ष वेधूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप वल्लभ यांनी केला. 


 28 बँकांच्या 22,842 कोटी रुपयांचा घोटाळा


ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांच्या 22,842 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI ने ABG शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ABG शिपयार्ड ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे आहेत. ABG शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान झाला आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. शिपयार्ड कंपनीने एसबीआय बँकेचे 7089 कोटी, आयडीबीआय बँकेचे 3634 कोटी रुपये, बँक ऑफ बडोद्याचे 1614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेचे 1244 कोटी रुपये आणि  1228 कोटी रुपये इंडियन ओवरसीज बँकेकडून घेतले आहेत. एलआयसीचे देखील 134 कोटी रुपये या कंपनीत अडकले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha