BJP Vs Opposition Leaders : देशात फक्त विरोधी पक्षांतील नेत्याची ईडी आणि सीबीआयच्या धाडी हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय झाला आहे.  भ्रष्टाचार फक्त विरोधी पक्षातच आहे का? असाही सवाल उपस्थित होत आहे. भ्रष्टाचार, मनी लाँड्रिंग हा विषय देशातील अनेक राज्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूल ते आम आदमी पार्टी (AAP) पर्यंतच्या नेत्यांच्या मागे विविध कारणांनी चौकशीचा ससेमीरा लावला गेला आहे. यातून सोनिया गांधी आणि राहुल गांधीही सुटू शकलेले नाहीत.


शिवसेना नेते संजय राऊत, तृणमूल काँग्रेस नेते पार्थ चॅटर्जी यांच्या विरोधात ईडीने नुकतीच केलेली चौकशी आणि आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयचे छापे, यामुळे देशभरात राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मात्र, भाजपचे नेते धुतल्या तांदळाचे नसल्याचाही आरोप होत आहे. 


मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा


सीबीआयने 19 ऑगस्ट रोजी उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित एका प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला. सीबीआयने मद्य धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमितता आणि भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सिसोदिया यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. उपमुख्यमंत्र्यांवर दारू दुकानांचे परवाने घेणाऱ्यांना गैरफायदा दिल्याचा आरोप आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून एनओसी मिळू न शकल्याने विमानतळावर दारू विक्रीचा परवाना घेणाऱ्यांना ३० कोटी रुपये परत केल्याचा आरोपही सिसोदिया यांच्यावर आहे. हे पैसे परत करण्याऐवजी ते जप्त करायला हवे होते, असे सांगितले जात आहे.


पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक


पत्रा चाळ जमीन प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला पत्रा चाळच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते, परंतु कंपनीने म्हाडाची दिशाभूल केली आणि सदनिका न बांधता ही जमीन अनेक बिल्डरांना 901.79 कोटींना विकली. नंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने मेडोज नावाचा प्रकल्प सुरू केला आणि फ्लॅटसाठी 138 कोटी रुपये उभे केले. 2010 मध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात 83 लाख रुपये ट्रान्सफर केले. या पैशातून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला होता.


नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया-राहुल गांधी यांची चौकशी


नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन दिवस सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली आहे. त्याचवेळी, याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर अनेक तास चौकशी केली होती. ऑगस्टच्या सुरुवातीला ईडीने अनेक ठिकाणी छापे टाकले होते. असोसिएटेड जर्नल लिमिटेड (एजेएल) आणि यंग इंडिया लिमिटेड (वायआयएल) यांच्यातील व्यवहारासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांची चौकशी केली.


पार्थ चॅटर्जींवर ईडीची कारवाई


ईडीने शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात 25 जुलै रोजी पश्चिम बंगाल सरकारमधील माजी मंत्री आणि TMC नेते पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. छाप्यांदरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी पार्थ चॅटर्जी आणि त्याची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ५० कोटींहून अधिक रोकड जप्त केली होती. अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. रोख रक्कम जप्त झाल्यानंतर टीएमसीने त्यांना मंत्रीपदावरून हटवले.


सत्येंद्र जैन यांच्यावर कारवाई 


ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले असून त्यात दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह अनेकांची नावे आहेत. ईडीच्या आरोपपत्रात सत्येंद्र जैन, त्यांची पत्नी पूनम जैन, वैभव जैन, अंकुश जैन, अजित प्रसाद जैन आणि सुनील जैन यांच्यासह चार खासगी कंपन्यांची नावे आहेत. या सर्वांवर मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांखाली उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ईडीच्या पथकाने 6 जून रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. यादरम्यान सत्येंद्र जैनच्या साथीदारांकडून 2.85 कोटी रोख आणि 1.80 किलो वजनाची 133 सोन्याची नाणी जप्त करण्यात आली. अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली.


अभिषेक बॅनर्जी यांचीही चौकशी सुरू आहे


तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे देखील राज्यातील एका कथित कोळसा घोटाळ्यात ईडीच्या चौकशीत आहेत. त्यांच्या पत्नीविरुद्धही ईडीचा तपास सुरू आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करताना तपास यंत्रणेने त्यांच्यावर कोळशाच्या तस्करीत सहभाग असल्याचा आरोप केला होता.


नवाब मलिक अटकेत


राष्ट्रवादीचे दिग्गज नेते नवाब मलिक हेही ईडीच्या तावडीत असून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा खटला सुरू आहे. ईडीने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या काही निकटवर्तीयांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक केली होती. 


अनिल देशमुखही तुरुंगाची हवा खात आहेत


महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ईडीने गेल्यावर्षी 2 नोव्हेंबर रोजी देशमुख यांना मनी लाँड्रिंग अंतर्गत अटक केली होती. देशमुखही सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. 2021 मध्ये त्याच्याविरुद्ध 24 ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचा आरोप केला होता.