Rahul Gandhi Disqualification Case: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काहीही होवा, त्याची पर्वा नाही, मी माझं काम करतच राहणार, आयडिया ऑफ इंडियाचे संरक्षण करत राहणार असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  






राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, आज नाही तर उद्या, सत्याचा विजय होणारच होता. मला काय करायचं आहे ते मला माहिती आहे. ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचे आभार आणि जनतेने भरभरून प्रेम दिलं, त्यांचंही आभार. 


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थिती लावली आणि सर्वांचे आभार मानले. 


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा तिरस्काराच्या विरोधात प्रेमाचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीनं देण्यात आली आहे. हा लोकशाहीचा विजय असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं. 






प्रियांका गांधी यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, गौतम बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे, तीन गोष्टी जास्त काळ लपून राहू शकत नाहीत त्या म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य. सर्वोच्च न्यायालायने न्याय्य निर्णय दिल्याबद्दल त्यांचे आभार. सत्यमेव जयते. 


मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल गांधी यांच्या दोषी असण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आता त्यांची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


या बातम्या वाचा: