नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तब्येत बिघडल्याने रविवारी (2 फेब्रुवारी) रात्री 7 वाजता त्यांना दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेर आज (5 फेब्रुवारी) त्यांना डिस्चार्ज मिळाला. सध्या सोनिया गांधींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


पोटात इन्फेक्शन झाल्याने सोनिया गांधी यांना 2 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र राहुल गांधी आणि कन्य प्रियांका गांधी वाड्राही उपस्थित होत्या. उपचारांनंतर सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचं म्हटलं जात आहे. सोनियांच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली असून त्यांची तब्येत स्थिर आहे, असं रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं.

खरंतर सोनिया गांधी मागील अनेक वर्षांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर अधूनमधून उपचारही सुरु असतात. त्यामुळे काँग्रेसच्या सभांमध्ये त्या फारशा दिसत नाहीत. सोनिया गांधी यांना अस्थमा आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेत जाऊन उपचारही घेतले होते.