नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीराम जन्मभूमीबाबत लोकसभेत मोठी घोषणा केली. आज सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलत होते. या बैठकीत राम मंदिर ट्रस्ट स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' या नावाची ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 9 फेब्रुवारीपर्यंत ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला 67.7 एकर हस्तांतरित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिराबाबत एक योजना तयार करण्यात आली आहे. राम मंदिर देशातील कोट्यावधी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. राम जन्मभूमीच्या आणि राम मंदिर निर्मितीच्या विषयावर मी बोलत आहे, हे मी माझं भाग्य समजतो. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला 67.7 एकर हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर 5 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डालाही देण्यात येणार असून उत्तर प्रदेश सरकारने याला मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


पुढे मोदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालायने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसे निर्णय घेण्यात आले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट राम मंदिर उभारणी संदर्भातील निर्णय घेईल. राम जन्मभूमीवर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत 67.7 एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला हस्तांतरित केली जाणार आहे.


संबंधित बातम्या