जळगाव : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील दोन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण केल्याच्या घटनेचा  तीव्र विरोध होत आहे. राज्यातील नेते या घटनेवर संताप व्यक्त करतच आहेत, आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही विरोध दर्शवला आहे.


या संतापजनक घटनेसाठी राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसच्या मनुवादी विचारांना दोषी ठरवलं आहे. याविरोधात आज आवाज उठवला नाही, तर इतिहास माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे. काँग्रेस अध्यक्षांनी ट्विटवर जळगावतील जामनेरमध्ये घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ शेअर करुन भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे.

त्यांनी लिहिलं आहे की, "महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा एवढाच होता की, ते एका सवर्ण विहिरीत पोहत होते. आज माणुसकीही अखेरच्या काडीच्या आधारावर आपली अस्मिता वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आरएसएस/भाजपच्या मनुवादाच्या, तिरस्काराच्या विषारी राजकारणाविरोधात आम्ही आवाज उठवला नाही, तर इतिहास आम्हाला कधीच माफ करणार नाही."


काय आहे प्रकरण?
जळगावात जामनेर तालुक्यातील वाकडी गावात राहणारी मातंग समाजाची मुलं भटका जोशी समाजातील आरोपीच्या विहिरीत पोहण्यासाठी गेली होती. हा प्रकार समजताच आरोपींनी तिघांना नग्न करुन अमानुष मारहाण केली. इतकंच नाही, तर त्यांची गावात धिंड काढली आणि शेतातील खोलीत अमानुषपणे मारहाण केली.

ही घटना रविवारी दहा जून रोजी घडल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. मात्र आरोपीकडून फिर्याद माघारी घेण्यासाठी पीडित कुटुंबियांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 'आम्हाला या गावात राहायचं आहे' असं सांगत पीडितांच्या कुटुंबीयांनीही तक्रार नोंदवण्याबाबत टाळाटाळ केल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली.

आरोपीला अटक : दिलीप कांबळे
या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपी सोनू लोहारसह त्याच्या साथीदाराला अटक केल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे.

आरोपींवर मारहाण करणे आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे यासाठी आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

राजकीय नेत्यांची वाकडी गावात रीघ
दरम्यान, या घटनेनंतर आता राजकीय पक्षाचे नेते वाकडी गावात दाखल होत आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही गावाला भेट दिली आणि पीडितांची विचारपूस केली. तर काँग्रेसतर्फे आज एक पथक गावात दाखल झालं. त्यात अब्दुल सत्तार आणि राजू वाघमारेंचा समावेश आहे.

दुसऱ्याच विहिरीचा पंचनामा : गावकरी
मात्र पोलिसांनी दुसऱ्याच विहिरीचा पंचनामा केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आरोपींच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी पंचनाम्यात घटनेतली विहीरच बदलल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या

विहिरीत पोहल्याने जळगावात तिघा मुलांना नग्न करुन मारहाण