पणजी : 5 मार्च रोजी स्वादुपिंडावरील उपचारासाठी अमेरिकेत गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर जवळपास सव्वातीन महिन्यानंतर गुरुवारी (14 जून) गोव्यात पोहोचले. सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पर्रिकर दाबोळी विमानतळावरुन बाहेर पडून आपल्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी गेले.

पर्रिकर यांचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे वगळता एकही आमदार, मंत्री किंवा पदाधिकारी उपस्थित नव्हता. पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर, आरोग्यमंत्री राणे आणि पर्रिकर यांचे दोन्ही मुलं तसेच खाजगी सचिव रुपेश कामत एवढीच मोजकी मंडळी पर्रिकर यांच्यासोबत होती.

मुख्यमंत्री कार्यालयाचे कर्मचारी त्यांच्या कारसह विमानतळावर पाच वाजल्यापासूनच हजर होते. विमानतळ परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पर्रिकर यांची देहबोली नेहमीप्रमाणे सकारात्मक दिसून आली तरी उपचारामुळे त्यांचे बाह्यस्वरूप बदलून गेले आहे. त्यांचे केस विरळ झाले आहेत. शरीर थकल्यासारखे जाणवत आहे.

विमानतळावरुन बाहेर पडल्यानंतर पर्रिकर हे पोलिसांच्या गराड्यातून थेट आपल्या कारमध्ये बसून निघून गेले. त्यांनी आपल्या चाहत्यांकडे बघून हास्य केले आणि हात दाखवून अभिवादन केले.

पर्रिकर हे उपचारासाठी अमेरिकेत गेल्यापासून मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही. शुक्रवारी म्हणजेच आज ही बैठक घेण्याची पर्रिकर यांची इच्छा आहे. मात्र लांबपल्ल्याचा प्रवास करुन आल्याने लगेच त्यांना मंत्रिमंडळ बैठक घेण्यास परवानगी मिळेल की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.

मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत राज्य कारभार हाताळण्यासाठी तीन मंत्र्यांची सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. या समितीला 31 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री परत आल्याने ही समिती आता बरखास्त होईल.
मंत्रिमंडळ बैठकी शिवाय 18 जून रोजी क्रांतीदिनाच्या जाहीर कार्यक्रमाला पर्रिकर हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसे झाले तर तो त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ठरणार आहे.

5 मार्च, 13 मे आणि 31 मे अशा तीन दिवशी पर्रिकर यांनी व्हिडीओ संदेश पाठवून लोकांशी संवाद साधला होता. त्यामुळे 3 महिन्यानंतर पर्रिकर 18 जूनच्या क्रांतीदिन सोहळ्यात सहभागी झाले तर त्यांना बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्रिकर मंत्रिमंडळ बैठक कुठे घेणार? यापुढे पर्रिकर यांचा जनसंपर्क कसा असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.