नवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसमध्ये आता संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितल्यानंतर या पराभावाची समीक्षा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाचही राज्यामध्ये काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला होता. आता त्या पराभवाची समीक्षा करण्यासाठी प्रत्येक राज्याची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यावर देण्यात आली आहे. पंजाबची जबाबदारी ही अजय माकन यांच्याकडे तर गोव्याची जबाबदारी ही रजनी पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसाठी जितेंद्र सिंह तर उत्तराखंडसाठी अविनाश पांडे तसेच मणिपूरसाठी जयराम रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, पाच राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर या राज्यांतील प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला होता. त्यानंतर आज पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा हायकमांडकडे सोपवला आहे. त्यात आता जी 23 गटाच्या विरोधाची धारही वाढत चालली आहे. जी 23 गटाने आजही एक स्वतंत्र बैठक घेऊन पक्षाच्या नेतृत्वावर चर्चा केली आहे. त्यावर हा गट सातत्याने बैठका घेऊन काँग्रेसला दुर्बल करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राज्यसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. त्यामुळे आता गांधी परिवाराला समर्थन करणारा एक गट तर जी 23 हा दुसरा गट अशी विभागणी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडी काँग्रेसला कुठे घेऊन जाणार, काँग्रेस अभेद्य राहणार की फुटणार या चर्चांना त्यामुळे सुरुवात झाली.
संबंधित बातम्या :
- Rahul Gandhi : राहुल गांधींनी पूर्णपणे बाजूला राहावं, जी 23 गटाची मागणी मान्य होणार का?
- Congress : पराभव जिव्हारी..., राजीनामा द्या! पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा; सोनिया गांधींचा आदेश
- Congress: नेतृत्व सोडत गांधी परिवाराने दुसऱ्यांना संधी द्यावी : कपिल सिब्बल