Sonia Gandhi : " देशात सध्या अल्पसंख्यांक समाजाला लक्ष्य केले जात असून अल्पसंख्यांक हे आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत. शिवाय ते आपल्या देशाचे समान नागरिक आहेत. देशात सध्या भीतीदायक वातावरण तयार करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे, असा आरोप कांग्रेसच्या हंगामी अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर केला आहे. 


राजस्थानमधील उदयपूर येथे आज काँग्रेच्या नवसंकल्प चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत. या शिबिरात बोलताना सोनिया गांधी यांनी देशातील सध्य परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांनी यावेळी शेतकरीविरोधी कायद्यांवरूनही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. 


सोनिया गांधी म्हणाल्या, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जे काळे कायदे आणले होते, त्याविरोधात काँग्रेसने संसदेत आणि संसदेबाहेर देखील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला. काँग्रेसच्या कार्यकाळात उभा करण्यात आलेले सार्वजनिक उपक्रम केंद्र सरकारकडून विकले जात आहेत. 


"देशात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. यूपीए सरकारचा मनरेगा आणि अन्न सुरक्षा कायदा कमकुवत केला जात आहे. लोकांच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, त्याबद्दल आम्ही अनभिज्ञ नाही. चिंतन शिबिरातून बाहेर पडल्यानंतर नव्या आत्मविश्वासाने आणि नव्या निर्धाराने जनतेत जाऊ, असा विश्वास सोनिया गांधी यांनी यावेळी व्यक्त केला. 


सोनिया गांधी यांनी यावेळी काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या स्थितीबद्दल देखील चिंता व्यक्त केली. "काँग्रेस पक्षाची स्थिती सध्या चांगली नाही. विलक्षण परिस्थिती फक्त असाधारण मार्गांनीच हाताळली जाऊ शकते. पक्षाने नेत्यांना आजपर्यंत खूप काही दिले आहे. आता पक्षाचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे. आजचे चिंतन शिबिर म्हणजे भाजप आणि आरएसएसच्या धोरणांमुळे देशासमोरील आव्हानांवर चिंतन करण्याची एक चांगली संधी आहे. देशाच्या प्रश्नांवर चिंतन करण्याची आणि पक्षासमोरील समस्यांवर आत्मपरीक्षण करण्याची ही संधी आहे, असे सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.  


दरम्यान, काँग्रेसच्या आजच्या चिंतन शिबिरात एकाच कुटुंबातील एका सदस्यालाच तिकीट मिळणार यावर सर्वांची सहमती झाली असल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. याबरोबरच काँग्रेसचे जेष्ठ नेते 
कपिल सिब्बल आणि हार्दिक पटेल हे या शिबिराला उपस्थित नव्हते. यावरही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.  


महत्वाच्या बातम्या


Congress : काँग्रेसचा नवा फॉर्म्युला, 'एक परिवार, एक तिकीट'; सुरुवात गांधी घराण्यापासून होण्याची शक्यता


Congress : काँग्रेसचा 'एक परिवार, एक तिकीट' फॉर्म्युला, पण...