छत्तीसगड : काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. सध्या त्यांच्या ट्रेनमधून प्रवास करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी सामान्य नागरिकांशी संवाद देखील साधला. या वर्षाच्या अखेरिस छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आलीये. 


काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन राहुल गांधींचे हे फोटो शेअर केले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी बिलासपूरहून रायपूरपर्यंतचा प्रवास केला असल्याची माहिती देण्यात आली. या प्रवासादरम्यान त्यांना 'जननायक' असं संबोधण्यात आल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. तर एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे ट्रेनच्या स्लीपर कोचमधून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राहुल गांधी यांना अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या. 






कुठून परतले होते राहुल गांधी?


पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या गृहनिर्माण न्याय परिषद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी सोमवारी (25 सप्टेंबर) बिलासपूर जिल्ह्यातील परसाडा गावात गेले होते. यावेळी त्यांनी एका सभेला देखील संबोधित केले. त्यानंतर ते बिलासपूर रेल्वे स्थानकावर पोहचले. तिथून त्यांनी रायपूरला जाण्यासाठी इंटरसिटी एक्सप्रेसमधून प्रवास केला. 






हे नेते राहुल गांधींसोबत होते उपस्थित


यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी कुमारी सेलजा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज आणि इतर नेतेही यावेळी उपस्थित होते. याच महिन्याच्या सुरुवातील  छत्तीसगडमधून धावणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसकडून संपूर्ण राज्यभर रेल रोको करण्यात आले आहे. 


राहुल गांधी यांचा कुलीचा अंदाज 


काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे कुलीच्या अंदाजात दिसले होते. दिल्लीच्या आनंद विहार रेल्वेस्थानकावर राहुल गांधी यांचा हा अंदाज पाहायला मिळाला होता. यावेळी राहुल गांधी यांनी कुलीचा गणवेश परिधान केला आणि हाताला 756 नंबरचा बिल्ला देखील लावला. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर हमाल आणि रिक्षाचालक खूप आनंदी दिसत होते. राहुल गांधींच्या या अंदाजाचे फोटो काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन शेअर केले होते. 


हेही वाचा : 


New Delhi: 'कुली' नंबर 756... राहुल गांधी हातात बिल्ला अन् लाल शर्ट घालून पोहोचले आनंद विहार रेल्वे स्टेशनवर