भोपाळ : भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसनं कंबर कसली आहे. भाजपची मातृसंघटना असलेल्या रा.स्व.संघाच्या धर्तीवर काँग्रेसनंही राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघ (RCSS) नावाच्या संघटनेची स्थापना केली आहे. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि माजी ऑलिम्पिक खेळाडू असलम शेर खान यांनी बुधवारी याची घोषणा केली.

असलम शेर खान म्हणाले की, ''राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघ ही नवी संघटना पुढील वर्षी होणाऱ्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला मदत करेल. ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक भाजपला मागच्या दरवाजातून मदत करुन सत्तेत आणतं, तशीच काँग्रेसचीही ही संघटना काम करेल.''

विशेष म्हणजे, या संघटनेचं स्वरुप देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच असणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र, संघाच्या गणवेशाप्रमाणे या संघटनेचा विशिष्ठ असा गणवेश नसेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ''निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. मात्र, सध्या जमीनी स्तरावरील कार्यकर्त्यांची काँग्रेसकडे कमतरता आहे. त्यामुळे काँग्रेसची ही नवी संघटना असे कार्यकर्ते तयार करेल,'' असंही यावेळी असलम यांनी सांगितलं.

''काँग्रेसला सत्तेत यायचं असेल, तर केवळ अल्पसंख्याक मतदरांच्या आधारावर ते शक्य नाही. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतूनही ते स्पष्ट झालं आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष तसेच काँग्रेसच्या विचारांशी बांधील असणारे कार्यकर्ते ही संघटना तयार करेल.''  अशीही त्यांनी यावेळी सांगितलं.

मात्र, काँग्रेसची यापूर्वीच काँग्रेस सेवा दल ही संघटना अस्तित्वात असताना, हा खटाटोप कशासाठी? असा प्रश्न असलम यांना विचारला असता, यावर सध्या काँग्रेस सेवा दलाचं अस्तित्व संपुष्टात आलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.