जयपूर : सीसीडी अर्थात 'कॅफे कॉफी डे'ची क्रेझ फक्त तरुणच नव्हे, तर सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांमध्ये आहे. 'कॉफी आणि बरंच काही' या संकल्पनेवर आधारित सीसीडीच्या प्रतिमेला धक्का देणारी एक घटना सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. फ्रीजमध्ये झुरळं फिरताना पाहून हटकल्याने सीसीडीतील महिला कर्मचाऱ्याने ग्राहकाच्याच कानशिलात लगावल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

खरं तर, सीसीडीच्या फ्रीजमध्ये झुरळ दिसल्यानंतर या प्रकरणाला खरी सुरुवात झाली आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये सीसीडीच्या एका शाखेत अर्पण वर्मा नामक ग्राहक गेला होता. त्यावेळी फ्रीजमध्ये त्याला काही झुरळं फिरताना दिसली. हे पाहून संतापलेल्या अर्पणने मोबाईल काढला आणि शूटिंगला सुरुवात केली.

घटनेचं ऑडिओ-व्हिज्युअल वार्तांकन करताना इथे कशी झुरळं दिसत आहेत, हे अर्पण सांगत होता.
त्यानंतर त्याने झुरळांवरुन कॅमेरा पॅन केला तो महिला कर्मचाऱ्यावर. सुरुवातीला या महिलेची तारांबळ उडाली. तोंड लपवत तिने तिथून धावपळ केली, मात्र ही धाव घेतली ती खुद्द अर्पणच्याच दिशेने. अनपेक्षितपणे तिने त्याच्या कानशिलात लगावली.

विशेष म्हणजे तिने कानाखाली वाजवल्याचा प्रकारही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शूट सुरु असतानाच तिच्या हल्ल्यामुळे कॅमेराही काहिसा हादरला. आधीच संतापलेल्या अर्पणचा हा व्हिडिओ निखिल आनंद नावाच्या व्यक्तीने ट्विटर अकाऊण्टवर पोस्ट केला आणि लागलीच तो व्हायरलही झाला.

https://twitter.com/Kailash9545/status/846399015222755330

https://twitter.com/nikhilanand88/status/845713721221697537