Rahul Gandhi Disqualified: मानहानीच्या खटल्यातील शिक्षेविरोधात काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमवार, 3 एप्रिल रोजी सुरत न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. या प्रकरणी झालेल्या शिक्षेविरोधात राहुल 11 दिवसांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. तसेच, ते नियमित जामिनासाठी न्यायालयात अर्जही दाखल करणार आहे. त्यांच्यासोबत प्रियंका गांधीही सुरतमध्ये येऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. तसेच, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत (राजस्थान), भूपेश बघेल (छत्तीसगड) आणि सुखविंदर सिंह सुखू (हिमाचल प्रदेश) हे तीन राज्यांचे मुख्यमंत्रीही राहुल गांधी यांच्यासोबत न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान राहुल गांधींसोबत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही सुरत न्यायालयात उपस्थित असणार आहेत.


मोदी आडनाव प्रकरणात 23 मार्चला सुरतच्या कोर्टानं राहुल गांधींना दोषी ठरवलं आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आलं. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी न्यायालयानं राहुल गांधींना 30 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार, आज शिक्षा सुनावल्यानंतर तब्बल 11 दिवसांनी राहुल गांधी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. मोदी आडनावावरील वक्तव्यासंदर्भात झालेल्या राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द  करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अपात्रतेची कारवाई रद्द होण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे राहुल गांधी सेशन कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. 


2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमध्ये मोदी आडनावाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर गुजरातमधील भाजप आमदारानं राहुल गांधींविरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या विरोधात, न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवत तब्बल 4 वर्षांनी शिक्षा सुनावली होती.


सुशील कुमार मोदी यांनी पाटणा येथे मानहानीचा खटला दाखल केलाय


बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी मोदी आडनावाच्या मुद्द्यावर पाटणाच्या दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयानं राहुल गांधींना समन्स बजावलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे. भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांचे वकील एसडी संजय यांनी याप्रकरणासंदर्भात बोलताना सांगितलं की, न्यायालयानं राहुल गांधींना वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तर सुशील कुमार मोदी यांनी आशा व्यक्त केली की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना येथील न्यायालय योग्य ती शिक्षा देईल.