नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणाही साधला होता. पण, आता मात्र राहुल गांधी यांच्यावरच भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. यामागचं कारणंही तसंच ठरलं आहे.


(Congress) काँग्रेस, या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा दिवस अतिशय खास समजला जात असतानाच राहुल गांधींची मात्र अनुपस्थिती असेल. पक्षाच्या वर्धापन दिनाच्याच दिवशी राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेले असल्याची बाब समोर येत आहे. जे कळताच भाजप नेते गिरीराज सिंह यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.


राहुल गांधी यांची भारतातील सुट्टी संपली आहे. आता ते इटलीला परत गेले आहेत, असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर निशाणा साधला. फक्त सिंह नव्हे तर, गांधी यांचा हा परदेश दौरा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना वाव देत आहे.


28 डिसेंबर हा दिवस काँग्रेस पक्षाच्या निमित्तानं फार महत्त्वाचा. 2020 या वर्षात याच दिवशी काँग्रेस पक्षाचा 136 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. पण, या साऱ्या वातावरणात राहुल गांधी मात्र कुठेच दिसत नाहीयेत. ते एका खासही कारणामुळं परदेश वारीला गेल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. राहुल गांधी पुढील काही दिवस परदेश दौऱ्यावर असतील असं त्यांनी स्पष्ट केलं.





राहुल गांधी नेमके कुठे गेले याची माहिती सुरजेवाला यांनी दिलेली नसली तरीही सूत्रांच्या माहितीनुसार ते इटलीला गेले असल्याचं म्हटलं जात आहे. ते कतार एअरवेजच्या विमानानं इटलीतील मिलान येथे रवाना झाले असल्याचं कळत आहे.