नवी दिल्ली: काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री  गुरुदास कामत यांचं वयाच्या 63 व्या वर्षी निधन झालं. आज (बुधवारी) सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. विशेष म्हणजे आदल्याच दिवशी रात्री गुरुदास कामत यांनी ट्विटरवरुन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या.


'ईद-उल-अज्हा मुबारक' असं ट्वीट गुरुदास कामत यांनी मंगळवारी रात्री 11 वाजून 44 मिनिटांनी केलं होतं. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देणारं कामत यांचंं ते ट्वीट अखेरचं ठरलं. त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांना हार्ट अटॅक आला आणि गुरुदास कामत यांनी जगाचा निरोप घेतला.


त्याआधी, कामत यांनी मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजता काँग्रेस खासदार अहमद पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. काँग्रेसच्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दलही कामतांनी पटेल यांचं अभिनंदन केलं होतं.


मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्याच वर्षी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी आणि पर्यायाने गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेल्या गुरुदास कामतांनी मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी मोलाची भूमिका बजावली होती.

गुरुदास कामत 2017 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते. त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली, दमन दीवची जबाबदारी होती. शिवाय ते काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही होते.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात त्यांचे आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे वाद समोर आले होते. त्यानंतर कामत यांनी आपल्याला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, असं सांगत सर्व पदांचा राजीनामा राहुल गांधींकडे दिला होता.

5 ऑक्टोबर 1954 रोजी गुरुदास कामत यांचा कर्नाटकातील अंकोला येथे जन्म झाला. त्यांचं बरेचसं आयुष्य मुंबईतील कुर्ल्यात गेलं. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. गुरुदास कामत यांच्या कुटुंबात कुणीही राजकीय क्षेत्रात नव्हते. त्यांचे वडील वसंत आनंदराव कामत हे प्रीमियर ऑटोमोबाईल्समध्ये काम करत.

1980 मध्ये गुरुदास कामत यांची महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. 1984 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यानंतर 1987 मध्ये त्यांची भारतीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. गुरुदास कामत हे 2003 मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 2008 पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं.

गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास:

1972 साली विद्यार्थी चळवळीतून राजकीय क्षेत्रात प्रवेश

1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर

पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व

2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम

केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार

2014  मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव

गुरुदास कामत यांचा शैक्षणिक प्रवास

गुरुदास कामत यांचं शालेय शिक्षण कुर्ल्यातील होली क्रॉस स्कूलमध्ये झालं. त्यानंतर कॉमर्स शाखेसाठी माटुंग्यातील पोद्दार कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते शिक्षणात अत्यंत हुशार विद्यार्थी होते. 1996 साली पोतदार कॉलेजकडून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारा ‘प्रो. वेलिंगकर ट्रॉफी’ पुरस्कार देण्यात आला होता.

पोद्दार कॉलेजमध्ये असताना ते बॅडमिंटन टीमचे नेतृत्त्व करत, तसेच जिमखान्याचे सेक्रेटरीही होते. 1975-76 साली गुरुदास कामत यांची पोतदार कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी थेट निवड झाली होती.

त्यानंतर गुरुदास कामत यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेमध्ये प्रवेश घेतला. तिथेही ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय राहिले. गव्हर्नमेंट लॉ कॉलजच्या विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली. अभ्यासातही ते प्रचंड हुशार होते. गव्हर्नमेंट लॉ कॉलेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून, मुंबई विद्यापीठात द्वितीय आले होते.

समित्यांवरील भूषवलेली पदे :

1984 – 1989 – सदस्य, सल्लागार समिती, रसायन आणि खते मंत्रालय
1987 - 1989 – सदस्य, रेल्वे बिलासंबंधित संयुक्त समिती
1991 – 1996
सदस्य, औद्योगिक समिती
सदस्य, रेल्वे संमेलन समिती
सदस्य, सल्लागार समिती, रसायन आणि खते मंत्रालय
1998 – 1999
सदस्य, याचिका समिती
सदस्य, पेट्रोलियम आणि केमिकल समिती
सदस्य, सल्लागार समिती, अर्थ मंत्रालय
2004 - 2009
अध्यक्ष. ऊर्जेवरील स्थायी समिती
सदस्य, सल्लागार समिती, पेट्रोलियम अँड नॅशरल गॅस मंत्रालय
सदस्य, अधिकृत भाषा समिती
सदस्य, अर्थ समिती
2005 – 2009
सदस्य, प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया
संबंधित बातम्या 

काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचं निधन

विद्यार्थी चळवळ ते केंद्रीय मंत्री, गुरुदास कामत यांचा प्रवास

गुरुदास कामत यांचा काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा