नवी दिल्ली : भारताच्या दौऱ्यावर आलेले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकारनं व्हॉट्सअॅपच्या सीईओंना तीन सूचना केल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. भारतात व्हॉट्सअॅपचं कार्यालय सुरु करावं ही प्रमुख सूचना असल्याचं रविशंकर प्रसाद म्हणाले.
व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला तंबी दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. या अफवांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून या अफवांवर ठोस नियंत्रण मिळवणं गरजेचे असल्याचे सरकारनं स्पष्ट केलं आहे.
व्हॉट्सअॅपवरून झपाट्यानं व्हायरल होणाऱ्या फेक न्यूज आणि अफवा रोखण्यासाठी प्रभावी तांत्रिक उपाय शोधावे, भारतात व्हॉट्सअॅपचं स्थानिक कार्यालय स्थापन करावं, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक उपाय शोधावे आणि तक्रार निवारण करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी या प्रमुख सूचना रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपच्या सीईओंना दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसात देशात व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे देशातील अनेक भागात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. जमावाकडून हत्या आणि मारहाणीच्या काही घटना समोर आल्या होत्या. या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपच्या सीईओंना दिल्या आहेत.