नवी दिल्ली : “औरंगजेबापेक्षाही क्रूर हुकूमशाह असलेल्या नरेंद्र मोदींनी आज देशाला 43 वर्षांपूर्वीच्या आणीबाणीबाबत धडे दिले. पण ते विसरले की औरंगजेबने फक्त आपल्या वडिलांना वेठीस धरलं होतं. या 49 महिन्यांच्या अघोषित आणीबाणीत मोदींनी तर स्वत:च्या पक्षासह लोकशाहीलाच वेठीस धरलं आहे,” असं म्हणत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.


माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर आरोप केले होते.

त्यावर उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, “ देशात गेल्या 49 महिन्यांपासून अघोषित आणीबाणी सुरु आहे. इंदिरा गांधींना दोष देऊन शेतकऱ्यांना तुम्ही दिलेले दीडपट हमीभावाचे आश्वासन पूर्ण होणार आहे का,” असा बोचरा सवालही सुरजेवालांनी केला.

‘आणीबाणीची आठवण काढून तुम्हाला अच्छे दिन आणता येणार आहेत का,’ असंही त्यांनी मोदींना विचारलं.

पुढे बोलताना सुरजेवाला म्हणाले, “इंदिरा गांधींनी एक व्यापक लढाई लढली होती.”

दरम्यान, “काँग्रेस आजही आणीबाणीच्याच मानसिकतेत असून न्यायमूर्तींवर महाभियोग आणणं आणि आणीबाणी लादणं यामध्ये काहीही फरक नाही,” असं विधान मुंबईतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.