अहमदाबाद: गुजरात निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी अहमदाबादेत पत्रकार परिषद घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्ला चढवला.


“मोदी गुजरात निवडणूक प्रचारात केवळ स्वत:बद्दल आणि काँग्रेसबद्दल बोलले आहेत, त्यांनी गुजरातच्या विकासाबद्दल चकार शब्दही काढलेला नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.

इतकंच नाही तर भ्रष्टाराचाबद्दल बोलणारे मोदी अमित शाहांचा मुलगा जयबाबत गप्प का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच यावेळी गुजरातमध्ये आश्चर्यकारक निकाल दिसेल, असा दावा राहुल गांधींनी केला.

केदारनाथ गुजरातमध्ये आहे का? : राहुल

राहुल गांधी आता मंदिरात जाऊ लागले आहेत, असा प्रचार भाजपकडून केला जात आहे. त्याला राहुल गांधींनी उत्तर दिलं. राहुल म्हणाले, “मी गुजरातमध्ये ज्या ज्या मंदिरात गेलो, तिथे तिथे गुजरातच्या विकासाची प्रार्थना केली. मंदिरात जाण्यास बंदी आहे का? मी आताच मंदिरात जातोय असं भाजप म्हणतंय. पण मी केदारनाथलाही गेलो होतो. केदारनाथ गुजरातमध्ये आहे का? मी मंदिरात जात नाही ही भाजपने उठवलेली आवई आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

अमित शाहाच्या मुलावर निशाणा

राहुल यांनी यावेळी अमित शाहा आणि त्यांच्या मुलावरही निशाणा साधला. मोदींनी आपल्या प्रचारात अमित शाहा यांचा मुलगा जयच्या भ्रष्टाचाराबद्दल एक चकार शब्दही काढला नाही, असं राहुल म्हणाले.

जय शाह यांच्या कंपनीचा व्यवसाय भाजप सत्तेत आल्यानंतर अनेक पटींनी वाढल्याचा आरोप आहे.