लखनौ : जीन्स पँट घालण्यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचं अजब विधान समोर आलं आहे. ज्या मुलीची लग्नाच्या विधी जीन्स पँट घालून करण्याची इच्छा असेल, तिच्याशी कोणताही मुलगा लग्न करणार नाही, असं सत्यपाल सिंह म्हणाले.


उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये महाराणा प्रताप शिक्षा परिषदेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात सत्यपाल सिंह बोलत होते. यावेळी मंचावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही हजर होते.

या कॉलेजने कॅम्पसमध्ये जीन्स आणि पटियाला ड्रेसवर बंदी घातली आहे. शिवाया कॉलेजने वर्गात मोबाईल फोनच्या वापरालाही मनाई केली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह म्हणाले की, "कपड्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. एखादा पुरुष म्हणत असेल की, मी जीन्स घालून मंदिराचा महंत बनेन, तर लोकांना ते आवडेल का? कोणालाही ते आवडणार नाही. तसंच एखादी मुलगी जीन्स घालून मंडपात गेली, तर किती मुलांनी तिच्याशी लग्न करण्याची इच्छा असेल?"

https://twitter.com/ANI/status/940182500894064640

कोण आहेत सत्यपाल सिंह?
सत्यपाल सिंह 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिन्यातच त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात जागा मिळाली.

सत्यपाल सिंह 1980 च्या बॅचमधील महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.