नवी दिल्ली : परदेशात पसार होण्याआधी झालेल्या विजय मल्ल्या-अरुण जेटली भेटीचं वादळ ताजं असतानाच काँग्रेसने आज मेहुल चोकसी प्रकरणात एक नवा आरोप केला आहे. याही वेळा देशाचे अर्थमंत्रीच काँग्रेसच्या निशाण्यावर आहेत. देशातून पळून जाण्याच्या काही दिवस आधीच मेहुल चोकसीने जेटलींची कन्या आणि जावई जयेश बक्षी यांच्या फर्मला रिटेनर म्हणून नेमलं होतं. पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदी, मेहुल चोकसी जवळपास 26 हजार कोटी रुपयांचा चुना लावून पसार झालेत. या सगळ्या घोटाळ्याची कल्पना साडेतीन वर्षांपासूनच  सरकारला होती, असाही आरोप काँग्रेसने केला आहे.

देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना मेहुल चोकसीच्या बँक घोटाळ्याची पूर्ण कल्पना होती, शिवाय चोकसीची कंपनी गीतांजली जेम्स लिमिटेडचं काम जेटली यांची मुलगी सोनाली आणि जावई जयेश बक्षी यांच्याच फर्मला दिलं गेलं होतं, त्यासाठी त्यांना 24 लाख रुपयेही दिले गेल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

दिल्लीमधे काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट, राजीव सातव, सुषमा सिंह देव यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. 4 जानेवारी 2018 रोजी मेहुल चोकसी देशातून फरार झाला. त्याच्या काही दिवस आधीच जेटली यांची कन्या सोनाली आणि जावई जयेश बक्षी यांच्या फर्मनं मेहुल चोकसीचं काम घेतलं होतं. त्यासाठी 24 लाख रुपयेही घेतले. मात्र सीबीआयने चोकसीच्या कंपनीविरोधात केस दाखल केल्यानंतर तातडीने हे पैसे मेहुल चोकसीच्याच खात्यात जमा करण्यात आले. जे-जे लोक परदेशात पळून जात आहेत, त्यांना मदत करण्यात भाजपच्याच नेत्यांचा कसा संबंध येतो, असा सवाल यावेळी काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला.

याशिवाय केस दाखल झाल्यानंतर हे पैसे सरकारकडे जमा न करता, मेहुल चोकसीच्या खात्यात परत करण्याची काय गरज होती? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जेटलींना मेहुल चोकसीच्या संपूर्ण गैरकारभाराची माहिती आधीपासूनच होती, फक्त कन्या आणि जावयाच्या प्रेमापोटी त्यांनी हे प्रकरण बाहेर येऊ दिलं नाही असा आरोप यावेळी सचिन पायलट यांनी केला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करुन अरुण जेटलींच्या कन्येवर आरोप केले आहेत. जेटलीकन्या सोनाली बक्षी चोक्सीच्या पेरोलवर असल्याचा दावा करत आयसीआयसीआय बँकेचा खाते क्रमांकही राहुल गांधींनी शेअर केला आहे.


सीबीआयने 31 जानेवारीला केस दाखल केल्यावर 20 फेब्रुवारीला गीतांजली जेम्सच्या खात्यात हे पैसे चोरीछुपे जमा करण्यात आले, असंही पायलट यांनी म्हटलं. या प्रकरणात जेटलींच्या राजीनाम्याचीही मागणी काँग्रेसनं केली आहे.