Port Blair Airport : केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारला (Andaman Nicobar) जागतिक दर्जाच्या विमानतळाची (Airport) भेट मिळाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवार (18 जुलै) रोजी अंदमान-निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन केलं. पण अगदी काही दिवसांपूर्वी उद्घाटन केलेल्या या विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळल्याचं समोर आलं आहे


सुमारे 710 कोटी रुपये खर्च करुन पोर्ट ब्लेअर हे विमानतळ उभारण्यात आले होते.  40,800 चौरस मीटर क्षेत्रावर उभारलेले हे विमानतळ दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष प्रवाशांना  हाताळण्यास सक्षम असल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता या विमानतळाच्या छताच्या भाग कोसळल्याने या विमानतळाचे निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. 


विरोधकांचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र 


या घटनेवर काँग्रेसचे नेते जयराम महेश यांनी ट्वीट करत टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी हल्ली ज्या गोष्टीचं उद्घाटन करतात ती एकतर अपूर्ण असते किंवा निकृष्ट दर्जाची असते, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी टीकास्त्र सोडलं आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, मंत्री हे त्यांच्या सेन्सेक्सला चालना देण्याचे काम करत आहेत, मात्र त्याचा फटका करदात्यांना बसत आहे. अशी वाईट अवस्था नव्या भारताची आहे. 






या विमानतळाच्या बाहेर छत वाढवण्यात आले होते. त्यामुळे या भागामध्ये सीसीटीव्ही आणि सुशोभिकरणाचे काम सुरु होते. सध्या संपूर्ण देशात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अंदमान आणि निकोबारमध्येही पावसाने हजेरी लावली. त्यातच रात्री सोसाट्याचा वारा वाहू लागला. त्यामुळे या छताच्या खाली सुशोभिकरणासाठी जोडलेला जवळपास 10 चौरस मीटरचा भाग कोसळला. याबाबत विमानतळ प्रशासनाने माहिती दिली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या विमानतळामुळे अंदमान आणि निकोबारच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  तसेच यामुळे  केंद्रशासित प्रदेशाचा संपर्क वाढवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


हे ही वाचा :


Weather Update : दिल्लीत यमुनेच्या पातळीत वाढ, तर उत्तर प्रदेश-राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज