Padma Awards: केंद्र सरकारला पद्म पुरस्कारांसाठी (Padma Awards) नावांची शिफारस करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत दिलीप वळसे पाटील , दादा भुसे, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत आणि अप्पर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) यांचा समावेश करण्यात आला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचे निर्देश केंद्र शासनाने (Central Government) राज्य शासनाला दिले आहेत. त्यामुळे राज्य शासनाकडून 26 जानेवारी 2024 रोजी घोषित करण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावाची शिफारस करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. आता ही समिती शासनाकडे विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या नावांची छाननी करुन केंद्र पाठवणार आहे. 


पद्म पुरस्कारासाठी मान्यवरांची निवड करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांकडून प्रतिवर्षी एक समिती नियुक्त करण्यात येते. या समितीला  पद्म-पुरस्कार-समिती असं म्हटलं जातं. राज्य शासनाकडून गठित करण्यात आलेली समिती ही मान्यवरांच्या नावांची शिफारस या समितीकडे करते. या समितीचे प्रमुख मंत्रिमंडळ-सचिव (कॅबिनेट सेक्रेटरी) असतात. तसेच गृहसचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि चार ते सहा ख्यातनाम व्यक्तींचा या समितीत समाविष्ट करण्यात येतो. ही समिती शिफारस करण्यात आलेल्या नामांकनातून पुरस्कारासाठी नावे निश्चित करतात. त्यानंतर ही नावे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येते. 


भारत सरकारकडून 1954 पासून भारतरत्न आणि पद्मविभूषण असे दोन नागरी पुरस्कारांना सुरुवात झाली. यामधील पद्म पुरस्कार हा तीन वर्गात विभागून देण्यात येतो. हा पुरस्कार पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अशा वर्गात विभागून देण्यात येतो. राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे 8 जानेवारी 1955 या वर्गांना अनुक्रमे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशी नावे देण्यात आली होती. 


त्यातील पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. प्रत्येक वर्षी 26 जानेवारीच्या पू्र्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. तर मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यामध्ये राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र आणि एक पदक यांचा समावेश करण्यात येतो. यामधील पद्मभूषण पुरस्कार हे असामान्य आणि विशेष कार्यासाठी प्रदान करण्यात येतात. तर पद्मभूषण पुरस्कार हा पुरस्कार उच्च स्तरीय विशेष कार्यासाठी प्रदान केला जातो. पद्मश्री पुरस्कार विशेष कार्यासाठी प्रदान केले जातात. त्यामुळे या पुरस्कारांचे देशामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. 


हेही वाचा : 


Farmers Day : राज्यात 30 ऑगस्ट हा दिवस 'शेतकरी दिन' म्हणून साजरा होणार, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचं स्मरण