नवी दिल्ली: गोल्डन ग्लोब रेसदरम्यान हिंदी महासागरात अडकलेले नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांना वाचवण्यात यश आलं आहे. भारतीय नौदलाने ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली. सध्या अभिलाष टॉमी यांना गंभीर दुखापत झाली असली तरी ते शुद्धीत आहेत. त्यांना फ्रान्सची मच्छिमार बोट ओसायरिसवर हलवण्यात आलं आहे.


शिडाची बोट तुटल्यामुळे अभिलाष टॉमी दोन दिवसांपासून समुद्रात अडकले होते. त्यातच त्यांना गंभीर दुखापत झाल्याने हलताही येत नव्हतं. सॅटेलाईटद्वारे त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळाली होती. त्यावेळी अभिलाष टॉमी यांनी स्ट्रेचरची मागणी केली होती.


अभिलाष टॉमी यांच्या बचावासाठी भारत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या बचावपथकांनी धाव घेतली होती. कमांडर अभिलाष टॉमी यांच्या रेस्क्यू‌ ऑपरेशनसाठी फ्रेन्च बोट ओसायरिस नेमक्या लोकेशनवर पोहोचण्याच्या बेतात असल्याची माहिती नौदलाने आज सकाळीच दिली होती. अखेर ओसायरिस बोट कमांडर टॉमींजवळ पोहोचली आणि भारतासह जगभरातील अनेकांचा जीव भांड्यात पडला.

प्रचंड वादळाने बोट तुटली

जगप्रसिद्ध आणि थरारक गोल्डन ग्लोब स्पर्धेत सहभागी झालेले, भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी हे स्पर्धेदरम्यान हिंदी महासागरातील वादळामुळे जबर जखमी झाले. वादळाने त्यांच्या बोटीचा चेंदामेंदा झाला. त्यांची दुखापत इतकी गंभीर आहे की, त्यांना ना हात ना पाय हलवता येतो. अशा परिस्थितीत ते खोल समुद्रात बोटीच्या तुकड्यांच्या आधारे तरंगत होते. त्यांनी स्ट्रेचरची मागणी केली होती.

वादळ आणि तब्बल 14 मीटर उंच लाटा तसंच 130 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात अभिलाष यांच्या बोटीचा चक्काचूर झाला. वाऱ्याच्या वेगाने बोट तुटल्यामुळे अभिलाष टॉमी जखमी झाले.

गोल्डन ग्लोब रेसचं वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकाला 50 वर्षापूर्वीची बोट म्हणजे त्यामध्ये अत्याधुनिक काहीही नाही अशी बोट वापरावी लागते. केवळ संपर्क यंत्रणाच आधुनिक आहे. शिडाच्या बोटीने 42 हजार 280 किमीची विश्वभ्रमंती एकट्यानेच करायची असते.

अभिलाष टॉमी हे  कीर्तीचक्र विजेते आहेत. 2013 मध्ये त्यांनी जगप्रदक्षिणा केली होती. गोल्डन ग्लोब स्पर्धेत ते  स्वदेशी बनावटीची बोट एस व्ही थुरियाच्या आधारे भारताचं प्रतिनिधित्व करत होते.

गोल्डन ग्लोब रेस

अभिलाष टॉमी हे भारतीय नौदलाचे अधिकारी आहेत. गोल्डन ग्लोब रेस ही जगातील थरारक नौकानयन स्पर्धा आहे. गोल्डन ग्लोब रेसचं वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकाला 50 वर्षापूर्वीची बोट म्हणजे त्यामध्ये अत्याधुनिक काहीही नाही अशी बोट वापरावी लागते. केवळ संपर्क यंत्रणाच आधुनिक आहे. शिडाच्या बोटीने 42 हजार 280 किमीची विश्वभ्रमंती एकट्यानेच करायची असते. ही स्पर्धा फ्रान्समधून 1 जुलैला सुरु झाली होती. समुद्रातील खराब हवामानामुळे त्यांचं शिडाचं जहाज उलटलं.

संबंधित बातमी 

खोल समुद्रात बोटीचा चेंदामेंदा, नौदल अधिकारी अभिलाष टॉमींची मृत्यूशी झुंज