नवी दिल्ली : देशाला लोकसहभागाची मोठी परंपरा आहे. लोकसहभागातूनच विकास होतो. त्यामुळे न्यू इंडियासाठी 'टीम इंडिया'ला एकत्र यावं लागेल, कारण एकी हीच आपली खरी ताकद आहे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणातून केलं.


देशाच्या 71 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. विकासासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सन्मानासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना मोदींनी नमन केलं.

भारत छोडो आंदोलनाला यावर्षी 75 वर्षे पूर्ण झाली. चंपारण्य सत्याग्रहाला 100 वर्षे आणि लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हे वर्ष खास आहे, असं मोदी म्हणाले.

गोरखपूरच्या रुग्णालयात मृत्यू झालेल्या मुलांचाही मोदींनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला. अशा प्रसंगी देशाने एकता दाखवण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. शिवाय उत्तर भारतात आणि पश्चिम बंगालमध्ये पुरामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीवरही मोदी बोलले.

''न्यू इंडियासाठी टीम इंडियाची गरज''

स्वातंत्र्यासाठी 1942 ते 1947 या काळात भारताने एकीचं बळ दाखवलं. याच प्रकारे नवीन भारत साकारण्यासाठी पुढील पाच वर्ष म्हणजे 2022 पर्यंत सर्वांना एकत्र यायचं आहे. देशात कुणीही मोठं किंवा लहान नाही, सर्व जण समान आहेत, या सकारात्मक विचाराने देशाला पुढे न्यायचं आहे, असं मोदी म्हणाले.

चालतंय, चालू द्या, हा काळ आता गेला आहे. आता देश बदलतोय, बदल दिसतोय, हा काळ आहे, असंही मोदींनी सांगितलं.

देशातील प्रत्येक गरिबाला 2022 पर्यंत हक्काचं घर द्यायचंय. जातीभेद नष्ट करायचाय. देशाच्या विकासात सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठीही भारत सक्षम आहे. आपण सर्व जण मिळून असा भारत घडवू, जिथे स्वच्छता, स्वास्थ्य आणि स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असेल. शिवाय भ्रष्टाचार नसेल, वाद नसतील, जातीवाद नसेल, असा न्यू इंडिया घडवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मोदींनी केलं.

''रोजगार शोधणारे नव्हे, रोजगार देणारे तरुण असतील''

तरुणांना 21 व्या शतकाला अनुसरुण रोजगार कौशल्य देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारी पातळीवर काम सुरु आहेच. मुद्रा सारख्या योजनांमधून तरुण स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. सध्या प्रत्येक तरुण दोन ते तीन तरुणांना रोजगार देत आहे. भारतात रोजगार शोधणारे नाही, तर रोजगार देणारे तरुण असतील, असं मोदी म्हणाले.

भारत हा सर्वात मोठी युवाशक्ती असणारा देश आहे. येणारं 2018 हे वर्ष सामान्य वर्ष नसेल. 21 व्या शतकात ज्यांनी जन्म घेतलाय, त्यांच्यासाठी हे निर्णायक वर्ष असेल, असंही मोदींनी सांगितलं.

''तीन तलाक पीडित महिलांनी बुद्धीजीवी वर्गाला हलवलं''

तीन तलाकमुळे अनेक महिलांवर वाईट वेळ आली आहे. या पीडित महिलांनी देशव्यापी आंदोलन सुरु करुन बुद्धीजीवी वर्गाला हलवलं आहे. त्यामुळे देश या महिलांच्या पाठीशी आहे, असं मोदींनी सांगितलं.

''ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से''

‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तणावग्रस्त जम्मू काश्मीरवर भाष्य केलं.

यावेळी काश्मीरबाबत मोदी म्हणाले, “दहशतवादाविरोधी लढ्यासाठी अनेक देश भारतासोबत आहेत. दहशतवाद कधीही खपवून घेतला जाणार नाही. मात्र काश्मीरचा प्रश्न हा ना गोळीने ना शिवीगाळीने सुटेल, गळाभेट हाच त्याला पर्याय आहे. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

याशिवाय एकीचं बळ हीच देशाची ताकद आहे. हा देश गांधी आणि बुद्धांचा आहे. इथे सर्वजण समान आहेत. न्यू इंडियाचं स्वप्न साकारण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, असंही मोदींनी नमूद केलं.

सर्जिकल स्ट्राईकने भारताची ताकद सर्वांना मान्य करावी लागली. भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहे, असंही मोदी म्हणाले.

''शेतात पाणी पोहोचवण्यासाठी 99 योजना''

मातीतून सोनं पिकवण्याची धमक माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात शेतीवर भाष्य केलं.

यावेळी शेतीबाबात मोदी म्हणाले, “मातीतून सोनं पिकवण्याची धमक माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे. पण त्यांना फक्त पुरेसं पाणी पाहिजे. शेतीसाठी आम्ही 99 योजना आणल्या. त्यापैकी 21 योजना सुरु झाल्या आहेत. 50 योजना लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचल्याशिवाय त्याचं उत्पन्न दुपट्ट होणार नाही. शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यंदा शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं, त्यामुळे डाळीचं विक्रमी उत्पन्न झालं. भारतात सरकारने डाळ खेरेदी करण्याची प्रथा कधीही नव्हती. मात्र सरकारने यावर्षी 16 लाख टन डाळ खरेदी करुन इतिहास रचला”, असं मोदी म्हणाले.

''नोटाबंदीनंतर 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उध्वस्त''

गेल्या तीन वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला. यात 1 लाख लोकांनी करचुकवेगिरी करुन हा पैसा दडवला होता. तसेच नोटाबंदीमुळे 3 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाल्याचं मोदींनी सांगितलं.

देशातील 3 लाख कंपन्या अशा आहेत. ज्यांचा काळा बाजार, हवाला रॅकेट आदीच्या माध्यमातून लाखोंचे आर्थिक व्यवहार सुरु आहेत. आतापर्यंत अशा पावणे दोनलाख कंपन्यांना टाळं ठोकलं ठोकल्याचं मोदींनी सांगितलं.

”या तीन लाख कंपन्यांपैकी काही कंपन्या अशाही आहेत, ज्यांनी दिलेल्या पत्त्यावर 400 कंपन्या सुरु आहेत. हे सर्व एकमेकाच्या संगनमतानं सुरु होतं. त्याकडं पाहणारं कुणी नव्हतं. पण आता असे गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारने कारवाई केली असल्याचं मोदींनी नमूद केलं.

”नोटाबंदीनंतर जवळपास 3 लाख कोटी रुपये परत आले. यातील जवळपास पावणे दोन लाख कोटी रुपये ज्या खात्यांमध्ये भरले होते, त्यातील व्यवहार संशयास्पद आहेत. यातील 18 लाख लोकांची ओळख पटवण्यात आली असून, त्याचं वर्षिक उत्त्पन्न किती? आणि त्यांनी सादर केलेला ताळेबंद यामध्ये प्रचंड तफावत आहे. विशेष म्हणजे, यातील 1 लाख लोक असेही आहेत, ज्यांनी आयुष्यात एकदाही कर भरला नव्हता.” अशी माहिती मोदींनी दिली.