नवी दिल्ली : मागील चोवीस तासांमध्ये हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर भागामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानाचा पारा खाली गेल्याचं पाहायला मिळालं. परिणामी येथील बहुतांशई भागांमध्ये बर्फवृष्टीही झाली. हिमाचल प्रदेशात रविवारी कुफरी, भरमौर, किलाँग आणि कल्पा या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. तर, राज्यातील काही भागांत हलक्या स्वरुपाचा पाऊसही झाला. हवामान खात्याकडूनच ही माहिती देण्यात आली.


शिमला हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांच्या कालावधीत किलाँगमध्ये 15 सेंटीमीटर इतकी बर्फवृष्टी झाली. कर, कल्पामध्ये 4.6 सेमी, कुफरी येथे 2 सेमी बर्फवृष्टी झाली. याशिवाय कांगडा 25.4 मिमी, चंबा 20 मिमी, पालमपूर, 17 मिमी, धरमशाला 14.8 मिमी, मनाली 10 मिमी आणि शिमला 1.7 मिमी अशा स्वरुपात पावसाचा शिडकावा झाल्याचंही सांगण्यात आलं.


पुढील तीन दिवसांपर्यंत या भागात किमान तापमान हे शुन्यापेक्षाही तीन ते चार अंश सेल्शिअसनं कमी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
जम्मू काश्मीर भागातही थंडीचा कडाका कायम आहे. इथं अनेक भागांमध्ये हिमवृष्टीमुळं आणि सासत्यानं वाढणाऱ्या शीतलहरीमुळं जनजीवनही विस्तकळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात सध्याच्या घडीला वाढणारा हा शीतलहरीचा कहर पाहता, देशातील इतरही भागांमध्ये याचे परिणाम पाहायला मिळत आहेत.


अंधकारमय भविष्याला दूर लोटण्यासाठी थंडीचा मारा सोसावाच लागेल; आंदोलक शेतकऱ्यांचा निर्धार


राजस्थान, मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातही बोचऱ्या थंडीची जाणीव होत आहे. नाशिक, परभणी, नागपूर, सोलापूर या भागांमध्ये हवामानात गारवा आला आहे. इथं मुंबईसह उपनगरंही थंडीच्या कडाक्यानं गारठली आहेत. मुख्य म्हणजे पुढील काही दिवसांमध्ये या भागांतही वातावरणातील गारवा वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात येत आहे.