नवी दिल्ली : देशात आपात्कालीन परिस्थितीत दोन कोरोना लस वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविशिल्ड' यांना रविवारी भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात कोरोना संसर्गात आघाडीवर काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना ही लस दिली जाईल, असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे.


फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना विनामूल्य लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी सरकारने एक 'कोविन' (कोविड व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क) अ‍ॅप तयार केला आहे. हा अ‍ॅप सुरुवातीपासून पूर्ण प्रक्रियेचे परीक्षण करेल. Co-Win ही इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क (eVIN) ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे.


कोविन अॅपशी संबंधित महत्वाची माहिती




  • केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या अ‍ॅपबद्दल यापूर्वीच माहिती दिली होती. लस घेण्यासाठी लोकांना या अ‍ॅपमध्ये स्वत: ची नोंदणी करावी लागेल. मात्र, हे अ‍ॅप फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर सुरु करण्यात येणार आहे.

  • हे अ‍ॅप्लीकेशन अद्याप सुरू करण्यात आलेलं नाही. हे प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. हे अ‍ॅप ड्राय रन दरम्यान देखील तपासले गेले होते. त्यात डेटा अपलोड करण्यात आला आणि हे अ‍ॅप योग्य प्रकारे कार्य करत आहे की नाही याची तपासणी करण्यात आली. जेणेकरुन जेव्हा लसीकरण सुरू होईल तेव्हा कोणतीही अडचण उद्भवू शकत नाही.

  • आरोग्य अधिकारी सध्या हे अ‍ॅप वापरत आहेत. या अ‍ॅपवर त्या आरोग्य कर्मचार्‍यांचा डेटा ते अपलोड करीत आहेत ज्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. ड्राय रन दरम्यान 75 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.

  • एकदा हा अ‍ॅप लाँच झाल्यावर त्यात चार मॉड्यूल असतील. यात वापरकर्ता प्रशासक मॉड्यूल, लाभार्थी नोंदणी, लसीकरण आणि लाभ वाटप आणि स्थिती अपडेट समाविष्ट असेल.

  • लाभार्थी नोंदणी अंतर्गत तीन पर्याय असतील. या अंतर्गत स्वत: ची नोंदणी, स्वतंत्र नोंदणी आणि बल्क अपलोडचा पर्याय असेल. स्वत:ची नोंदणी अंतर्गत, लाभार्थी वेब आणि मोबाईल अ‍ॅप्लीकेशनच्या मदतीने थेट त्यांची नोंदणी करू शकतील. यानंतर, माहितीची तपासणी होईल. यात वय पन्नास वर्षांपेक्षा जास्त आहे की कमी किंवा इतर रोगांनी ग्रस्त आहेत की नाही याची तपासणी करण्यात येईल.