CNG, PNG Price Hike : महागाईनं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चाप बसला आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तर दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ झाली आहे. दिल्लीकरांसाठी पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील पीएनजीच्या किमती आता प्रति एससीएम 4.25 रुपयांनी वाढल्या आहेत. या वाढलेल्या किमती 14 एप्रिलपासून लागू करण्यात आल्या आहेत. सध्या राजधानी दिल्लीत PNG ची किंमत 45.86/SCM वर गेली आहे. तर सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्लीत आजपासून सीएनजी 2.5 रुपयांनी महाग झाला आहे. यानंतर दिल्लीत सीएनजी 71.61 रुपये प्रति किलो दराने आला आहे. 


पीएनजी गॅसचा वापर घरं आणि औद्योगिक भागात केला जातो. सध्या दरवाढीमुळे त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरांवर होणार आहे. दिल्लीपूर्वी मंगळवारी महाराष्ट्रातील जनतेला पीएनजीच्या वाढलेल्या किमतीचा फटका बसला होता. महाराष्ट्रात मंगळवारी सीएनजीच्या किरकोळ किमतीत प्रति किलो 5 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4.50 रुपये प्रति घनमीटरने वाढ करण्यात आली. त्याच वेळी, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये, पीएनजीसह, मार्चपासून सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 12.50 रुपयांची वाढ झाली आहे.


PNG म्हणजे, 'पाइप्ड नॅचरल गॅस'. हा एक प्रकारचा नैसर्गिक वायू आहे, जो सामान्य लोक त्यांच्या दैनंदिन कामासाठी वापरतात. हा गॅस पाईपद्वारे घरं आणि कारखान्यांमध्ये पोहोचवला जातो. दिल्लीतील बहुतांश कारखाने पीएनजीवर चालतात. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. सध्या पीएनजी गॅस एलपीजीपेक्षा कितीतरी पटींनी स्वस्त आहे.


महाराष्ट्रात सीएनजी पाच रुपयांनी तर PNG साडेचार रुपयांनी महागला


महानगर गॅस लिमिटेडनं मंगळवारी एक निवेदन जारी करुन राज्यात दरवाढ जाहीर केली होती. या नव्या दरवाढीमुळे सीएनजीचा दर किलोमागे 72 रुपये झाला आहे, तर घरगुती पाईप अर्थात PNG चा दर आता किलोमागे 45.50 रुपये इतका झाला आहे. त्या आधी 6 एप्रिल रोजी मुंबईत सीएनजीच्या किमतीत 7 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 5 रुपयांची वाढ करण्यात आली होती. 1 एप्रिलला राज्य सरकारनं नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र सलग दोन वेळा झालेल्या दरवाढीनं सीएनजी, पीएनजीचे दर पुन्हा एकदा मूळ किमतीवर पोहोचले आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं केलेल्या व्हॅट कपातीचा ग्राहकांना फायदा झालाच नसल्याचं स्पष्ट झालं आहे.