नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. पुढच्या निवडणुका योगींच्याच चेहऱ्यावर लढल्या जाणार का? लढल्या तर त्यात योगींना निर्णयप्रक्रियेत किती मोकळीक असेल या दृष्टीनं त्यांचा हा दिल्ली दौरा महत्वाचा आहे.

Continues below advertisement


उत्तर प्रदेशच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर आल्यात आणि योगी आदित्यनाथ यांची राजकीय कुंडली ठरवण्याचं काम दिल्लीत सुरु आहे. काल (गुरुवारी) अमित शाह आणि आज पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांच्या या दोन महत्वपूर्ण भेटी पार पडल्यात. मोदींसोबत आज सव्वा तास आणि अमित शाहांसोबत काल दीड तास योगींची ही बैठक सुरु होती. या टायमिंगमधूनच विषयाचं गांभीर्य लक्षात येतं. यूपीच्या आगामी निवडणुका, अपेक्षित मंत्रिमंडळ विस्तार यावर या बैठकीत मंथन झाल्याचं समजतंय. 


उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी मार्चच्या दरम्यान विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. या निवडणुका योगींच्याच चेहऱ्यावर लढायच्या का याबाबत भाजप-संघ परिवारात गेल्या काही दिवसांपासून मंथन सुरु होतं. त्यासाठी अनेक बैठकांचं सत्र पार पडलं. योगींना ग्रीन सिग्नलही मिळालाय. पण तो नक्कीच काही अटी शर्तींसह असणार आहे. त्याचबाबतची चर्चा मोदी-शाहांच्या या बैठकांमध्ये झाली असावी.


योगी आदित्यनाथ हे ठाकूर आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ब्राम्हण समाज नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसमधून जितेन प्रसाद यांना भाजपमध्ये आणलं गेलं ते हेच संतुलन डोळ्यासमोर ठेवून. शिवाय गुजरात केडरचे अधिकारी ए के शर्मा हे मोदींचे अत्यंत खास समजले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांचाही यूपीच्या राजकारणात उदय झालाय.


योगींच्या बदलाची चर्चा का सुरुय?



  • उत्तर प्रदेशात कोरोनाची हाताळणी, गंगा किनाऱ्यावरचे मृतदेह यामुळे सरकारची बदनामी

  • अनेक आमदारांनी योगींच्या कार्यशैलीबाबतही हायकमांडकडे तक्रारी केल्या आहेत.

  • ठाकूर-ब्राम्हण या संघर्षात संतुलन साधण्यासाठी योगींसमोर काही सक्षम पर्याय उभे करण्याच्या विचारात भाजप दिसतंय.

  • तूर्तास यूपी भाजपमध्ये योगींचीच लोकप्रियता अधिक असली तरी यावेळी त्यांचे हात पहिल्यापेक्षा कमी मोकळे असतील एवढं नक्की 


प.बंगालच्या निवडणुकीत जोर लावूनही भाजपला समाधानकारक यश आलेलं नाही. आता पुढच्या वर्षी मार्चच्या दरम्यान पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. ज्यात यूपी हे सर्वाधिक महत्वाचं आहे. कोरोनाकाळ, शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर यात मतदारांचा कौल दिसेल. जो 2024 च्या निवडणुकांचा टोन सेट करणारा ठरेल. मोदी-शाहांच्या दिल्लीतल्या बैठका भाजपसाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे हेच दाखवून देणाऱ्या ठरतात.