तिरुमाला : सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबासह तिरुपती बालाजीचे दर्शन घेतलं. त्यांनी यावेळी बालाजीला अभिषेकही केला. त्या वेळी सरन्यायाधीशांचे वेदिक मंत्रोच्चारात, पारंपरिक पद्धतीने तिरुपतीच्या पुजाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचे 48 वे सरन्यायाधीश असणारे एनव्ही रमणा हे आंध्र प्रदेशातील असून सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे ते राज्यातील पहिलेच व्यक्ती आहेत. 


सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर एनव्ही रमना यांनी पहिल्यांदाच तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. आपली पत्नी एन शिवमाला आणि कुटुंबासह दर्शनाला आलेल्या सरन्यायाधीशांचं मंदिराच्या महाद्वारापाशी वेदोक्त मंत्रोच्चारामध्ये स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सरन्यायाधीशांनी पारंपरिक पद्धतीने तिरुपती बालाजीच्या पर्वतावरील मंदिरात अभिषेक केला. या प्रसंगी तिरुपती देवस्थान समितीचे अध्यक्ष वायव्ही सुब्बारेड्डी आणि ईओ केएस जवाहर रेड्डी यांनी सरन्यायाधीशांना बालाजीचा प्रसाद दिला. 


गुरुवारी संध्याकाळी सरन्यायाधीश रमणा आणि त्यांच्या कुटुंबाचं तिरुपतीच्या पद्मावती गेस्ट हाऊसवर आगमन झालं. त्यावेळी त्यांचं स्वागत तिरुपती देवस्थान समितीचे अध्यक्ष वायव्ही सुब्बारेड्डी आणि ईओ केएस जवाहर रेड्डी यांनी केलं. गुरुवारी संध्याकाळी सरन्यायाधीशांनी पर्वतावरील मंदिरातील बालाजीच्या पूजा केली आणि एकांत सेवेमध्ये भाग घेतला होता. आज सकाळी त्यांनी बालाजीला अभिषेक केला. 


महत्वाच्या बातम्या :