बेंगलुरु: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात ‘लव जिहाद’ प्रकरण घडल्यास आरोपीचे 'राम नाम सत्य' करण्याचा इशारा दिला असतानाच आता भाजप शासित कर्नाटकनेही ‘लव जिहाद’ विरोधात कायदा करण्याची तयारी केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की सरकार लवकरच ‘लव जिहाद’ विरोधात कायदा करणार आहे.
मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा म्हणाले की, "यासंबंधी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आधीच चर्चा करण्यात आली आहे. येत्या दोन तीन दिवसात याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल. त्यांनी हेही सांगितले की इतर राज्यात लव जिहाद प्रकरणावरुन काय स्थिती आहे याच्याशी कर्नाटक राज्याचे काही देणंघेणं नाही. लव जिहाद प्रकरणात कर्नाटक सरकार लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करेल."
हरियाणा सरकार ‘लव जिहाद’ वर कायदा करायच्या तयारीत
भाजप शासित हरियाणा सरकारही ‘लव जिहाद’ वर कायदा करायच्या तयारीत आहे. हरियाणाचे गृह मंत्री अनिल विज यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले की, राज्य सरकार ‘लव जिहाद’ वर कायदा करण्याच्या विचारात आहे आणि या मुद्द्यावरुन राज्य सरकारने हिमाचल प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे.
हरियाणाच्या वल्लभगडच्या निकिता तोमर हत्या प्रकरणात एका लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना अनिल विज म्हणाले की, आम्ही हरियाणा राज्यात ‘लव जिहाद’ च्या विरोधात कायदा पारित करण्याच्या तयारीत आहोत. निकिता तोमरच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर दाखल केलं जाईल. आरोपी तौसिफचा संबंध एका राजकारणी परिवाराशी आहे आणि या प्रकरणात सामिल असणाऱ्यांना 12 तासांच्या आत पकडले जाईल.
गेल्या वर्षी हिमाचल प्रदेश सरकारने ‘लव जिहाद’ वर एक विधेयक पारित केले होते. त्यामध्ये बळाचा वापर करुन किंवा प्रलोभनाच्या आधारे लग्न करुन मुलींचे धर्मांतर करणे हे बेकायदेशीर आणि दंडास पात्र असेल अशी तरतुद आहे.
काय आहे प्रकरण
निकिता तोमर ही 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आपला कॉलेजचा पेपर देऊन घरी निघाली होती. त्यावेळी दोन आरोपींनी तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. निकिताने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता एका आरोपीने तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्याचवेळी तिचा मृत्यू झाला. आरोपीने निकितावर लग्नासाठी धर्म परिवर्तन करण्याची जबरदस्ती केली होती असा आरोप निकिताच्या परिवाराने केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
'लव्ह जिहाद' चालवणारे सुधारले नाहीत तर ‘राम नाम सत्य…': योगी आदित्यनाथ