श्रीहरिकोटा: या वर्षीच्या आपल्या पहिल्या उपग्रहाचे इस्त्रोकडून उद्या प्रक्षेपण करण्यात येणार आहे. शत्रू राष्ट्रावर नजर ठेवण्यासाठी इस्त्रो 7 नोव्हेंबर रोजी 'EOS-01' अर्थात अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइटचे प्रक्षेपण करणार आहे. या उपग्रहाचे PSLV-C49 रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळानुसार हे प्रक्षेपण 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. यासाठीचा काउंटडाऊन शुक्रवारी दुपारी 1 वाजून 2 मिनिटांनी सुरु झाला आहे.
EOS-01उपग्रह हा शत्रू राष्ट्रावर नजर ठेवण्यायसाठी उपयुक्त ठरेल. याच्या सिंथेटिक अॅपर्चर रडाराच्या माध्य़मातून दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच हा उपग्रह ढगांच्या अडथळ्यांना भेदून हाय रिझोल्युशनचे फोटो घ्यायला सक्षम आहे. त्यामुळे लष्कराच्या क्षमतेत वाढ होणार आहे. या उपग्रहाचा उपयोग भारत-चीनच्या सीमेवर नजर ठेवण्यासाठी चांगल्या पध्दतीने होऊ शकतो. त्याचबरोबर कृषी, वने, भूविज्ञान या क्षेत्रात तसेच किनारी भागातील सुरक्षा मजबुत करण्यासाठीही होणार आहे.
या उपग्रहासोबत इतर व्यापारी उपग्रहांचे इस्त्रोच्या न्युस्पेस इंडिया लिमिटेड सोबतच्या व्यापारी करारातंर्गत प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहांचे थेट प्रक्षेपण इस्त्रोच्या वेबसाईट, युट्युब, फेसबुक आणि ट्विटर चॅनेलवरुन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे या वर्षी इस्त्रोच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. त्या पार्श्वभूमीवर या वर्षातील हे इस्त्रोचे हे पहिले प्रक्षेपण आहे.
PSLV C49 च्या प्रक्षेपणानंतर इस्त्रो लगेचच PSLV C50 या रॉकेटच्या माध्यमातून GSAT-12R उपग्रह प्रक्षेपण करणार आहे. त्यानंतर GISAT-1 उपग्रहाला GSLV रॉकेटच्या माध्य़मातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
चीनसोबत लडाखच्या सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तसेच पाकिस्तानी घुसखोरीचा मुद्दा लक्षात घेता हा उपग्रह लष्कराला मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
2021 च्या सुरूवातीला लॉन्च होणार चांद्रयान-3
सिग्नलवर शिकणारी मुलं जाणार इस्रोला, जगण्याची भ्रांत असलेल्या मुलांचा प्रेरक प्रवास