नवी दिल्ली : अभिनेत्री मल्लिका दुआची आई आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्या पत्नी चिन्ना दुआ यांचं काल (11 जून) कोरोनामुळे निधन झालं आहे. चिन्ना दुआ यांनी वयाच्या 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विनोद दुआ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. चिन्ना दुआ यांचे खरं नाव पद्मावती दुआ होतं. चिन्ना या प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट होत्या. तसेच गायक आणि व्हॉल्गर देखील होत्या. 


चिन्ना आणि विनोद दुआ यांना मे महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोघांनाही गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विनोद दुआ सातत्याने आपले आणि पत्नी चिन्ना यांचे हेल्थ अपडेट सोशल मीडियावर शेअर करत होते. त्याचवेळी मल्लिकाने लोकांना त्यांच्या पालकांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं.


सर्वप्रथम, मल्लिका दुआने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून वडील विनोद दुआ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती  दिली होती. त्यानंतर चिन्ना दुआ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. चिन्ना यांनी लिहिले की, "13 मे पूर्वी काही दिवस आधी मला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितले की मला सिटोकिन स्टॉर्मचा त्रास आहे. त्यानंतर मला सेंट स्टीफन रुग्णालयात दाखल केले गेले. मला ऑक्सिजन बेडची गरज होती पण तिथे ऑक्सिजन बेड उपलब्ध नव्हता. त्यानंतर आम्हाला मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता मी आणि विनोद दोघेही मेदांता रुग्णालयात आहोत. लवकरच ठीक होऊन घरी परतू अशी आशा आहे. तोपर्यंत स्वत: ची काळजी घ्या, घरी रहा आणि सुरक्षित रहा."


मल्लिकाने काही दिवसांपूर्वीच आपल्या पालकांच्या तब्येतीची माहिती दिली होती. सोशल मीडियावर मल्लिकाने लिहिले होते की, "आईला अॅक्मो प्लस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ती बेशुद्ध आहे आणि दररोज संध्याकाळी आम्ही तिला कॉल करून गाणं ऐकवतो. डोळ्यांच्या पापण्या हलवून ती प्रतिसाद देते. आपण सर्वांनी ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करावी. ही एक धीमी प्रक्रिया आहे, परंतु यश नक्कीच मिळेल."