नवी दिल्ली : पंजाबची आगामी विधानसभा निवडणूक (Punjab Vidhansabha Election) ही शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष सोबत लढणार आहेत. यामुळं पंजाबमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. राज्यात 117 विधानसभा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 20 जागांवर बीएसपी आपला उमेदवार देणार आहे. तर उरलेल्या 97 जागांवर अकाली दलचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असतील. या युतीनंतर बसपा सुप्रीमो मायावती यांनी म्हटलं आहे की, ही युती राज्यातील जनतेच्या बहुप्रतीक्षित विकासाच्या नव्या युगाची सुरुवात करेल.
मायावती यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ''पंजाबमध्ये आज शिरोमणि अकाली दल आणि बहुजन समाज पार्टी यांच्यातील युतीची घोषणा एक नवीन राजकीय आणि सामाजिक प्रयोग आहे. ही नवी वाट राज्यातील जनतेला विकास, प्रगती आणि आनंदाच्या नव्या युगाची नांदी ठरेल. या ऐतिहासिक पावलासाठी शुभेच्छा, असं मायावतींनी म्हटलं आहे.
मायावती यांनी म्हटलं आहे की, पंजाबमधील समाजातील प्रत्येक घटक काँग्रेस पक्षाच्या शासनकाळात इथल्या गरीबी, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीसारख्या समस्यांशी झुंज देत आहे. यात सर्वाधिक त्रास हा दलित, शेतकरी, युवक आणि महिलांना होत आहे. यासाठी या युतीला विजयी करणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.