नवी दिल्ली : चिनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत पुन्हा एकदा घुसखोरी केली आहे. चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेच्या हवाल्यातून समोर येत आहे.


चिनी सैनिक 6 जुलैला लडाखच्या डेमचोक आणि कोयुल परिसरात घुसले होते. त्यावेळी त्यांनी चीनचा झेंडाही फडकवला. मिळालेल्या माहितीनुसार, तिबेटचे काही लोक दलाई लामा यांचा 84 वा जन्मदिवस साजरा करत होते. त्यांच्या हातात तिबेटीयन झेंडे होते. त्यावेळी भारतीय हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांचा विरोध केला.


एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान एसयूव्हीमधून प्रवास करत होते. त्यांनी तिबेटच्या शरणार्थींच्या समोर विरोध दर्शवला. सगळा प्रकार घडला त्यावेळी भारतीय जवानही घटनास्थळी उपस्थित होते. भारतीय जवानांनी चीनी सैनिकांची घुसखोरी रोखली.


काही तास त्याठिकाणी थांबल्यानंतर चिनी सैनिक मागे फिरले. चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत दीड किमी पर्यंत घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे.