चेन्नई : पाणीटंचाईमुळे तहानलेल्या चेन्नईकरांसाठी चक्क रेल्वेनं पाणी आलं आहे. 217 किलोमीटर दूर असलेल्या वेल्लोर जिल्ह्यातून आलेलं पाणी स्वच्छ करुन नागरिकांना पुरवलं जाईल. 50 वॅगन असलेल्या ट्रेनमधून तब्बल 25 लाख लीटर पाणी चेन्नईत आणण्यात आलं. यापूर्वी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता.

ट्रेनमध्ये पाणी भरण्यास गुरुवारी रात्री एक वाजता सुरुवात झाली. सकाळी सात वाजून 10 मिनिटांनी जोलारपेटमधून निघालेली ट्रेन दुपारच्या सुमारास चेन्नईला पोहचली. प्रत्येक वॅगनची 55 हजार लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. यासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी यांनी दिली.

चेन्नई हे एक कोटी लोकसंख्येचं शहर आहे. आठ ते नऊ महिन्यांपासून लोक पाणीटंचाईचा सामना करत आहेत. सलग दोन वर्ष पावसाने हुलकावणी दिली. तलाव ओस पडले. जमिनीच्या पोटातलं पाणी इतकं उपसलं, की आता फक्त धूळ बाहेर पडते. चेन्नई आणि कांचीपुरम परिसरात तीन हजार छोटे-मोठे तलाव आहेत, पण ते गाळाने भरले होते. काहींवर अतिक्रमण केलं. खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कष्ट सरकारने घेतले नाहीत.

ईशान्य मान्सून चेन्नईत दाखल होईलपर्यंत म्हणजे अजून जवळपास तीन महिने वेल्लोरमधून रेल्वेनं पाणी आणण्यात येईल. गेले वर्षभर 9 हजार टँकर चेन्नईला पाणी पुरवतात. पण आता शहराच्या जवळपासचे स्त्रोतही आटले आहेत. त्यामुळे जगणं कठीण झालं आहे. सरकारने पाणी पुरवठ्यासाठी 250 कोटींची तरतूद केली आहे. शहराची रोजची पाण्याची गरज तब्बल 900 एमएलडी इतकी प्रचंड आहे.

चेन्नईसारखीच वेळ 2020 च्या शेवटापर्यंत देशातल्या 21 शहरांवर येणार आहे. कारण अतिक्रमण, अमाप पाणी उपशामुळे जमिनीच्या पोटात पाणी राहणार नाही. 2030 पर्यंत 40 टक्के नागरिकांना पिण्याचं पाणी मिळणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. आजमितीला निम्मा देश दुष्काळाशी दोन हात करत आहे. पण पाण्याच्या प्रश्नावर ना सरकार गंभीर आहे ना लोकांना देणंघेणं.

नुकतीच लैला नावाची एक वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाली. आताच्या देशातल्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्थितीत फरक पडला नाही तर 2050 मध्ये भारत कसा असेल याचं काल्पनिक चित्र त्यात रंगवण्यात आलं आहे. त्यातला पहिलाच सीन पाणी चोरल्याच्या आरोपाचा आहे. पाणी ही त्या जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. चेन्नईकर 2050 ची स्थिती आजच अनुभवत आहेत. अख्ख्या देशाला सावध होण्यासाठी हे उदाहरण पुरेसं असावं.