China Vote Against India : जागतिक स्तरावर दहशतवाद संपवण्याच्या भारताच्या लढ्यात चीनने पुन्हा एकदा खोडा घातला आहे. पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला प्रतिबंधित दहशतवादी यादीत टाकण्याच्या मागणीवर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. तर भारत आणि अमेरिकेच्या प्रयत्नांविरोधात चीनने सुरक्षा परिषदेत तांत्रिक अडथळा आणला आहे.  


दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधित यादीत समावेश करण्याच्या अमेरिका आणि भारताच्या संयुक्त ठरावात अखेरच्या क्षणी चीनने आडकाठी घातली आहे. अमेरिका आणि भारताने मक्कीला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी सुरक्षा परिषदेच्या अल कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत संयुक्त ठराव सादर केला. यावेळी चीन वगळता सर्व सदस्यांनी भारताला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव 1267 अंतर्गत मक्कीला दहशतवादी यादीत टाकण्याचा प्रस्ताव भारताने सर्व सदस्यांमध्ये प्रसारित केला होता.


मक्कीला अमेरिकेने यापूर्वीच दहशतवादी घोषित केले आहे. मक्की हा लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या आणि 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदचा नातेवाईक आहे. मक्कीला 15 मे 2019 रोजी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली असून सद्या त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. 2020 मध्ये मक्कीला दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवण्यात आल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आणि शिक्षा सुनावण्यात आली. सध्या मक्की पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याची माहिती आहे.


दरम्यान, चीनच्या या निर्णयावर भारत सरकारच्या सूत्रांकडून खेद व्यक्त करण्यात आला आहे. अब्दुल रहमान मक्की या दहशतवाद्याविरुद्ध पुरेसे पुरावे असताना देखील चीनकडून त्याला प्रतिबंधित दहशतवादी यादीत टाकण्याला विरोध करण्यात आला आहे.   दहशतवाद्यांचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी चीनने टेक्निकल होल्डसारखी पद्धत वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील चीनने मसूद अझहरची यूएन लिस्ट रोखण्यासाठी टेक्निकल होल्ड सारखे कार्ड वापरले होते. चीनच्या या खोडसाळपणामुळे दहशतवाद पसरण्यास चालणा मिळत असल्याचे दिसून येत आहे.