Agneepath Scheme:  अग्निपथ योजना ही आताच जाहीर झाली आहे. यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीच नसून विरोधकांकडे मुद्दे नसल्याने या अग्निपथ योजनेवर वाद निर्माण केला जात असल्याचे केंद्रीय मंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग यांनी म्हटले आहे. विरोधकांकडे दुसरे काहीच काम नसल्याने त्यांच्याकडून आधी ईडी आणि आता अग्निपथ योजनेवर आक्षेप घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


मागील तीन दिवसांपासून केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' या सैन्य भरतीच्या योजनेच्या विरोधात हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये आंदोलन पेटले आहे. त्याशिवाय, भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांनी या योजनेवर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंह यांनी भाष्य केले आहे. भारतीय सैन्य हे रोजगाराचे साधन नाही. भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठी अटी शर्ती आहेत. आता या योजनेतही अटी असणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यांनी अग्निवीरांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले असल्याचे त्यांनी म्हटले. अग्निपथ योजनेत चार वर्षानंतरच्या सेवेनंतर निवृत्त व्हावे लागणार आहे. त्यानंतर रोजगाराचे काय असा मुद्दा आंदोलकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. भारतीय सैन्यात चार वर्षांची सेवा बजावून निवृत्त झालेल्या तरुणांची मानसिकता चुकीच्या गोष्टींकडे वळणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेत जवानांना कमी कालावधीचे प्रशिक्षण मिळणार असल्याचा दावा खोडून टाकताना त्यांनी म्हटले की, लष्करात प्रशिक्षण कधीच थांबत नाही. त्यामुळे जवानांना कमी कालावधीचे प्रशिक्षण मिळेल हा मुद्दा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. लष्कराच्या तुकडीत दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रशिक्षण सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले. 


दरम्यान, केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेला देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता या योजनेत सैन्य भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्ष इतकी ठेवली आहे. याआधी ही वयोमर्यादा 21 वर्ष इतकी होती. गेल्या दोन वर्षांत एकही भरती झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. वयोमर्यादेत असलेली ही सवलत यंदाच्या पहिल्या भरतीसाठीच लागू असणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: