नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरच्या घटनेबाबत आज एक नवी धक्कादायक माहिती समोर येतेय. चीनच्या तावडीत कालपर्यंत आपले 10 जवान होते, काल त्यांची अखेर सुटका झालीय. द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं या घटनेशी संबंधित लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही बातमी दिलीय. पण सरकारनं त्याबाबत अजून कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीय. भारताचे 10 जवान चीनच्या तावडीत होते की नव्हते? या 10 जवानांची काल सुटका झाल्याच्या बातम्यांवर सरकारचं अद्याप काहीच स्पष्टीकरण का नाही? नेमकं सत्य काय आहे हे का सांगितलं जात नाहीय?, असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. मात्र, या बातमीचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने खंडन केलं आहे. आमच्या ताब्यात भारतीय सैनिक नसल्याचं चीनने म्हटलं आहे.


भारत चीन सीमेवर झालेल्या घटनेबद्दल अजून काय काय लपवलं जातंय? 10 जवानांची सुटका झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की हे जवान नेमके पकडले कधी होते. सरकारनं तर त्याबद्दल अजून काहीच शब्द काढलेला नाहीय. पण या घटनेशी संबंधित अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं अनेक प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकांनी मात्र हे वृत्त दिलंय. काल म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता भारताच्या 10 जवानांची सुटका चीननं केल्याचं वृत्त आहे. या 10 जणांमधे 2 मेजर, 2 कॅप्टन असे एकूण 4 अधिकारी तर 6 सैनिक आहेत. गेल्या चार दिवसांपासून जी लष्करी पातळीवरची चर्चा सुरु होती, ती याच जवानांच्या सुटकेसाठी होती असाही दावा आता केला जातोय.


India-China Face Off | भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली!


सरकारकडून घटनेवर मौन
15-16 जूनच्या मध्यरात्री सीमेवर हिंसक झटापट झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं नेमकं काय झालं याची माहिती बाहेर येतेय. 20 जवान तर शहीद झाले, पण काही जवान बेपत्ता असल्याच्याही बातम्या होत्या. त्याबाबत सरकारनं कुठलं वक्तव्य केलं नव्हतं. काल संध्याकाळी जेव्हा या जवानांना सुखरुप परत आणण्यात यश आलं, त्यानंतर आर्मीनं फक्त एक त्रोटक वक्तव्य जाहीर केलं की कुठलंही भारतीय पथक बेपत्ता नाहीय. या त्रोटक वक्तव्यातून काहीच स्पष्ट होत नाही. काही बड्या लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जेव्हा या सर्व जवानांची सुटका झाली, त्यानंतरच हे स्टेटमेंट लष्करानं केलं असावं. हे 10 जवान परत येणं ही भारतासाठी प्रतिष्ठेची बाब होती, त्यामुळेच चर्चेच्या, प्रतिक्रियेच्या पातळीवर गेले चार दिवस सावधानता बाळगली जात असावी.


या 10 जवानांची सुटकेनंतर मेडिकल चाचणी होणार आहे, त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल असंही सांगितलं जातंय. 15 जूनची घटना झाल्यानंतरही मेजर जनरल स्तरावर चर्चेच्या तीन फेऱ्या सुरु होत्या. त्यात भारताच्या दृष्टीनं या 10 जणांची सुटका हाच मुद्दा होता. आता पुढच्या बैठकीत सीमेवरच्या तणावावर चर्चा होणार आहे. चीननं गलवान खोऱ्यावर नजर ठेवलीय, लडाखमधला लष्करीदृष्ट्या महत्वाचा पॉईटं फिंगर 4 ही त्यांच्या आवाक्यात आहे. आता आपल्या हद्दीत आलेल्या सैनिकांची आपण कशी सुटका केली हे औदार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखवायलाही ते मोकळे. त्यामुळे या सगळ्या खेळात चीनला हुशारीनं उत्तर द्यायला हवं असं लष्करातल्या सूत्रांचं म्हणणं आहे. या सुटकेबद्दल सरकारचं काही अधिकृत वक्तव्य येतंय का हेही पाहणं महत्वाचं असेल.


Aircraft P8I at LAC | चिनी सैन्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी नौदलाकडून 'पी 8 आय' एअरक्राफ्ट तैनात