नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीनंतर एलएसीवर तणाव आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता बैठकीला सुरुवात होईल. या व्हर्च्युअल बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि नेते सहभागी होतील.


काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही उपस्थित राहणार
या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बनर्जी, डीएमकेचे अध्यक्ष एम के स्टॅलिन, जनता दल (संयुक्त) नितीश कुमार, बसपाच्या प्रमुख मायावती, माकपचे नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी राजा, तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू, वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी, लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान हे उपस्थित राहणार आहेत.


गलवान संघर्षासाठी चीन जबाबदार : भारतीय पराराष्ट्र मंत्रालय
गलवान खोऱ्यात जे काही घडलं त्यासाठी चीनच जबाबदार आहे. भारताने कोणत्याही सामंजस्य कराराचं उल्लंघन केलेलं नाही. चीनने हा करार मोडला, असं भारताच्या पराराष्ट्र मंत्रालयाने म्हटल आहे. पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं.


भारताला डिवचलं तर उत्तर देण्यास सक्षम : पंतप्रधान
गलवान खोऱ्यात हिंसक झटापटीत देशाचे 20 जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली देताना पंतप्रधान मोदी बुधवारी म्हणाले होते की, "भारताला शांतता हवी आहे. पण आम्हाला डिवचलं तर उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत. आम्ही शेजारील देशांप्रती मैत्री आणि सहकार्याची भावना ठेवली आहे. परंतु देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी कठोर पावलं उचलण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही."


15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात हिंसक झटापट
लडाखच्या पूर्वेकडील गलवान खोऱ्यात सोमवारी (15 जून) रात्री चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत भारतीय सैन्यातील कर्नलसह 20 जवान शहीद झाले. दोन्ही देशांच्या सैन्यातील हा संघर्ष मागील पाच दशकांमधील सर्वात मोठा आहे. यामुळे दोन्ही देशांमधील सीमेवर आधीपासूनच सुरु असलेली परिस्थिती आता आणखीच गंभीर झाली आहे.