Chinese Loan App : दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम युनिटने ( IFSC ) आणि स्पेशल सेलने चीनच्या लोन अॅपद्वारे लोकांची फसवणूक आणि खंडणी प्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचा चीनमधील अॅपच्या मुख्य ऑपरेटरशी थेट संपर्क होता. ही संपूर्ण टोळी त्यांच्या इशाऱ्यावर काम करत होती, असा दावाही पोलिसांनी केला आहे. हरप्रीत सिंग आणि पंकज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 


डीसीपी केपीएस मल्होत्रा ​​यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, "हरप्रीत आणि पंकज हरिद्वारमध्ये लपून बसले होते. हे लोक चीनमध्ये बसलेल्या त्यांच्या बॉस अकिरा आणि एमीसाठी काम करतात. याच प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दीपक कुमार आणि सुमित यांच्याकडून पोलिसांना हरप्रीत आणि पंकजचा सुगावा मिळाला आहे."


चायनीज लोन अॅपद्वारे भारतीय लोकांना फसवणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम युनिटने  पर्दाफाश केला आहे. या टोळ्या कर्जदारांना बदनामी करण्याच्या नावाखाली धमकावत असत. पोलिसांनी या टोळीतील आठ जणांना काल अटक केली होती. काल अटक केलेले सर्व आठ आरोपी भारतीय आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व आरोपी चिनी टोळीसाठी काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे. चीनमधील या टोळीचा मास्टरमाइंड एक चायनीज असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. 


चिनी टोळीसाठी काम करणारे हे आरोपी क्रिप्टोकरन्सीद्वारे आपल्या चिनी मालकांना पैसे पाठवत होते, असा पोलिसांचा दावा आहे. या टोळीकडून अ‍ॅपद्वारे थोड्या प्रमाणात कर्ज दिले जाते. परंतु, त्याबदल्यात अनेक पट रुपये आकारले जातात. ज्यांना कर्जाची रक्कम परत करता आली नाही, किंवा कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देण्यास नकार दिला, त्यांचे फोटो मॉर्फ करून अश्लील बनवले जातात. शिवाय त्यांच्या नातेवाईकांना फोन करून त्रास दिला जातो. अशा प्रकारे अनेक भारतीय नागरिकांचा वैयक्तिक डेटा चीनमध्ये पोहोचला असून हे सर्व या चिनी लोन अॅप्समुळे घडले असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.


महत्वाच्य बातम्या